IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल
esakal July 10, 2026 04:45 AM

England clinch T20I series against India Marathi Cricket Update : इंग्लंडने चौथा ट्वेंटी-२० सामना जिंकून भारताविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.श्रेयस अय्यर वगळल्यास भारतीय फलंदाजांनी आज पुन्हा एकदा शरणागती पत्करली. ज्या खेळपट्टीवर १९०-२०० धावा होऊ शकल्या असत्या तिथे भारताला १५८ धावांपर्यंतच कसेबसे पोहोचता आले. हॅरी ब्रूक व फिल सॉल्ट या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करून इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. भारताचा हा खेळ पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यालाही करावं तरी काय? हा प्रश्न पडला असेल.

वैभव सूर्यवंशी ( १५), अभिषेक शर्मा ( १६) व इशान किशन ( ४) हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने निर्णायक खेळी केली. शिवम दुबेला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा डाव यशस्वी ठरला. त्याने २२ धावांची खेळी करताना श्रेयससह ५३ धावांची भागीदारी करून भारताच्या डावाला आकार दिला. पण, त्यानंतर गाडी पुन्हा गडगडली.. श्रेयस शेवटपर्यंत उभा राहिला आणि त्याच्या ४९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ८० धावांच्या खेळीने संघाला ७ बाद १५८ धावांपर्यंत पोहोचवले. ( श्रेयस अय्यर एकटा लढला, विराट कोहलीचा विक्रम मोडला )

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर ( २-२०) व जॉश टंग ( २-३६) यांनी चांगला मारा केला. आदील राशीद ( १-४९) महागडा ठरला, पंरतु त्याने अभिषेकची विकेट मिळवून दिली. विल जॅक्सनेही एक बळी टिपला. भारतीय गोलंदाजांनीची टिच्चून मारा करताना इंग्लंडच्या सलामीवीरांवर दडपण निर्माण केले होते. तिसऱ्या षटकात जॉस बटलरने षटकार खेचून दडपण झुगारण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्शदीप सिंगने पुढच्याच चेंडूवर त्याची ( ८) विकेट मिळवली. इंग्लंडला १३ धावांवर पहिला झटका बसला.

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

पण, हॅरी ब्रूक व फिल सॉल्ट ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि त्यांनी ४४ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. ब्रूकने २१ चेंडूंत अर्धशतक झळकावताना गोलंदाजांना हतबल केले. सॉल्टनेही ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने पहिली धाव घेण्यासाठी तब्बल १० चेंडू निर्धाव खेळले होते. सॉल्ट व ब्रूक यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करून संघाला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला. ब्रूक ३५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला, तर सॉल्टनेही ४२ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. इंग्लंडने १३.५ षटकांत १ बाद १५९ धावा केल्या.

भारत प्रथमच सलग सहा ट्वेंटी-२० सामन्यात विजयाशिवाय राहिला आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका २-० अशी गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर सलग तीन पराभव भारताने पाहिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.