Illegal Excavation Danger: पुणे–सोलापूर महामार्गावर परवानगीशिवाय धोकादायक चारी खोदकाम; ठेकेदार व जेसीबी चालकावर गुन्हा दाखल
esakal July 10, 2026 03:45 AM

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरवस्ती परिसरात कोणतीही शासकीय परवानगी न घेता आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांशिवाय जेसीबीच्या सहाय्याने चारीचे खोदकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर पोलिसांनी उघडकीस आणला. रस्त्यालगत बॅरिकेडिंग न करता खोदकाम करून मातीचे ढिगारे थेट महामार्गावर टाकल्याने वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याप्रकरणी ठेकेदार आणि जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहनिल ऊर्फ सनी सुनील खटाटे (वय २८, रा. खटाटे वस्ती, कुंजीरवाडी) आणि ठेकेदार एमडी काझी खान (वय २९, मूळ रा. समस्तीपूर, बिहार, सध्या रा. क्लासिक हाइट्स, कुंजीरवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार बापू शंकर वाघमोडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस हवालदार बापू वाघमोडे आणि रवी आहेर हे गस्त घालत असताना बोरकरवस्ती परिसरातील पुणे–सोलापूर महामार्गालगत जेसीबीद्वारे चारीचे खोदकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता, खोदकामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेडिंग, इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आढळले. तसेच खोदलेल्या चारीतील मातीचे मोठे ढिगारे थेट रस्त्यावर टाकण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

चौकशीदरम्यान जेसीबी चालक मोहनिल ऊर्फ सनी खटाटे याच्याकडे खोदकामासाठी आवश्यक परवानगीबाबत विचारणा केली असता, कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्याने सांगितले. हे काम ठेकेदार एमडी काझी खान यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानंतर ठेकेदाराची चौकशी केली असता, त्यांनीही कोणतीही शासकीय परवानगी न घेता काम सुरू असल्याचे स्पष्ट केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पालखी मार्ग आणि पुणे–सोलापूर महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. परवानगीशिवाय तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या कामांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.