Online Matka Raid: थेऊर फाट्यावर ऑनलाइन 'कल्याण मटका' रॅकेटवर लोणी काळभोर पोलिसांचा धडक छापा; मुख्य सूत्रधारासह दोघांवर गुन्हा, ११ हजारांचा मुद्देमाल जप्त
esakal July 10, 2026 03:45 AM

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात मोबाईलच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऑनलाइन ‘कल्याण मटका’ जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी धनडक कारवाई करत एका आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाईत मटका व्यवहारासाठी वापरण्यात येणारा मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य राजेंद्र सोनवणे (वय ३१, रा. लोणी काळभोर) आणि विकास कांबळे (रा. काळेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर गणपत धायतोंडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

थेऊर फाटा येथील नयन हॉटेलजवळ एक व्यक्ती मोबाईलवरून ऑनलाइन ‘कल्याण मटका’ स्वीकारत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (७ जुलै) रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी चैतन्य सोनवणे हा मोबाईलवर मटका व्यवहार करताना रंगेहात आढळून आला. त्याच्या मोबाईलच्या तपासणीत व्हॉट्सअॅपवरील मटक्याच्या चिठ्ठ्या, आकडे, ऑनलाइन व्यवहारांचे संदेश तसेच स्कॅनरद्वारे पैसे स्वीकारल्याचे पुरावे आढळले.

चौकशीत सोनवणे याने गोळा केलेली मटक्याची माहिती ‘विकास 1234’ या नावाने सेव्ह असलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवत असल्याची कबुली दिली. तसेच विकास कांबळे हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून, त्याचा रायटर आनंता पवार (रा. कुंजीरवाडी) असल्याचेही तपासात समोर आले आहे. याशिवाय आणखी तीन मोबाईल क्रमांकधारक मटका व्यवहारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या कारवाईमुळे थेऊर फाटा परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन मटका रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस अंमलदार सागर धायतोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.