Video : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. सापाने चावा घेतल्यानंतर एका तरुणाने संतापाच्या भरात त्याच सापाला दातांनी चावा घेतल्याचा प्रकार घडला. एवढेच नाही तर हातात साप घेऊन तो तब्बल चार किलोमीटर पायी चालत रुग्णालयात पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून डॉक्टरांनी मात्र नागरिकांना अशा धोकादायक कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना मालदा जिल्ह्यातील मोथाबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगारामपूर-दुलालगंज परिसरात घडली. जखमी तरुणाची ओळख फारुक मोमिन अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फारुक आपल्या घराजवळ काही काम करत असताना अचानक एका सापाने त्याच्या पायाला चावा घेतला. यामुळे संतप्त झालेल्या फारुकने सापाला पकडले आणि त्यालाच दातांनी चावा घेतल्याचा दावा केला. त्यानंतर तो मृत साप हातात घेऊन उपचारासाठी बंगीटोला ग्रामीण रुग्णालयाकडे निघाला.
घटनेच्या वेळी रुग्णालयात जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे फारुकने सुमारे चार किलोमीटरचे अंतर पायी पार करण्याचा निर्णय घेतला. वाटेत तो हातात साप घेऊन चालत होता आणि लोकांना, सापाने माझ्या पायाला चावा घेतला, मीही त्याला चावा घेतला. कोणतीही गाडी थांबत नाही, म्हणून मी पायी रुग्णालयात जात आहे असे सांगत होता. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक अवाक झाले. काहींनी या घटनेचा व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला, जो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
फारुकवर तातडीने प्राथमिक उपचार
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांना हा प्रकार ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. फारुकवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र काही वेळातच त्याची प्रकृती खालावू लागल्याने डॉक्टरांनी त्याला त्वरित मालदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवले. सध्या त्याच्यावर तेथे उपचार सुरू असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार त्याची प्रकृती गंभीर आहे.
कालियाचक-2 ब्लॉकचे ब्लॉक आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, संबंधित तरुणाला विषारी सापाने चावा घेतला असण्याची शक्यता आहे. मात्र सापाची नेमकी प्रजाती कोणती होती, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तरुणाने सापालाही चावा घेतल्याची माहिती मिळाली असून तो सापासह रुग्णालयात आला होता. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती खालावल्याने त्याला मालदा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.