'ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय, दाऊदच्या नावाने धमकीचा फोन; मुंबई पोलीस दलात खळबळ
Tv9 Marathi July 13, 2026 02:45 PM

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन शनिवारी मध्यरात्री आला. दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन हा पोलीस नियंत्रण कक्षाला आला. दाऊदच्या नावाने धमकी दिल्याने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर पोलीस तपासात ताज हॉटेलला धमकीचा फोन नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातून आल्याचं उघड झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात शनिवारी रात्री फोन आला होता. धमकी देणाऱ्याने दाऊदने हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवला आहे, असे सांगण्यात आले. या धमकीची माहिती तातडीने मुंबई पोलिसांना देण्यात आली.

आरोपीला शोधण्यसाठी पोलिसांचं पथक तयार 

माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच कुलाबा पोलीस, बॉम्बशोधक व नाशकचे (बीडीडीएस) पथक घटनास्थळी आले. त्यानंतर बीडीडीएसच्या पथकानं हॉटेलमधील प्रवेशद्वार, स्विमिंग पूल, विविध हॉल आदी महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी केली. त्यावेळी काही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. मात्र तो धमकीचा फोन हा तुर्भे परिसरातून आल्याचे उघड झालं. आरोपी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले असून तपास सुरू आहे.

अमरनाथ यात्रेत बॉम्ब ठेवणार, धमकीचा व्हॉट्सअॅप मेसेज

अमरनाथ यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘अमर सेतु’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर बॉम्बसंदर्भात धमकीचा संदेश आल्याने खळबळ उडाली. ‘मैं अमरनाथ यात्रा में बॉम्ब रखनेवाला हूँ’ असा धमकीचा मेसेज मोबाईलवरून पोस्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काश्मीर पोलीस कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती मुंबई पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाला दिली. संबंधित धमकी देणारा मोबाईलधारकाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर मेसेज करणारा व्यक्ती हनुमान नगर, आकुर्डी रोड, कांदिवली (पूर्व), येथील राहणारा असल्याचे तपासात समोर आलं आहे. याबाबत अधिक तपास मुंबई पोलिस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.