नेपाळमध्ये सत्तेवर आल्यापासून भारताला नडण्याची भूमिका घेणाऱ्या बालेन शाह सरकार विरोधात आता मायदेशात वातावरण तापू लागलं आहे. बालेन शाह सरकारने आल्यापासून भारताबरोबर संबंध बिघडवणारी भूमिका घेतली. सीमा शुल्क वाढ असेल किंवा सीमावाद असे विषय बालेन सरकारने उकरुन काढले.पण आता नेपाळमध्ये बालेन शाह सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरु लागले आहेत. नेपाळच्या राजकारणात सध्या एक मोठा बदल पहायला मिळतोय. Gen-Z च्या पाठिंब्याच्या आधारावर बालेन शाह पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचला. पण आज तेच लोक बालेन शाह विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. बालेन शाह सरकारला आपल्या कार्यकाळातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला आहे.
पुख्ता पुनर्वास योजनेतील झोपडपट्टीवासीय आणि बेघर लोकांना त्यांच्या स्थानावरुन हटवणं यावरुन वाद सुरु झाला आहे. रविवारी ‘जॉइंट नॅशनल स्क्वाटर्स फ्रंट’च्या नेतृत्वाखाली शेकडो लोक राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर उतरले होते. त्यांनी बालेन शाह सरकार विरोधात प्रदर्शन केलं. या विरोधामुळे बालेन शाहची प्रतिमा, त्यांचं सरकार यावर काय परिणाम होऊ शकतो. हा वाद वाढल्यास कुठल्या दिशेला जाईल ते समजून घ्या.
जवळपास 2600 कुटुंबांची घर तोडण्यात आली
एप्रिल महिन्यात या वादाची सुरुवात झाली. काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटी पोलिसांनी काठमांडू खोरं आणि नेपाळच्या अन्य भागातून एक मोठं अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरु केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास 2600 कुटुंबांची घर तोडण्यात आली. याचा थेट 15 हजार लोकांवर परिणाम झाला. बेघर झालेल्या जवळपास 325 कुटुंबांना नाईलाजाने काठमांडूच्या वेगवेगळ्या अस्थायी होल्डिंग सेंटर्स मध्ये रहावं लागत होतं. 2 जुलैला नेपाळ सरकारने आदेश दिला की, बेघर झालेल्या लोकांनी 6 जुलैपर्यंत होल्डिंग सेंटर्स रिकामी करावीत. आमच्या डोक्यावर छत नाही असं सांगतं जवळपास 60 कुटुंबांनी होल्डिंग सेंटर्स सोडायला नकार दिला.
बालेन शाह सरकारची डोकेदुखी वाढवली
या मुद्याने आता पंतप्रधान बालेन शाह सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष गगन कुमार थापा यांनी कार्यकर्त्यांच्या अटकेवरुन सरकारवर कठोर टीका केली. त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. विरोधाची ही आग फक्त काठमांडू पुरता मर्यादीत नाही. काठमांडूपासून 206 किमी लांब कोशी प्रांतातही ताब्यात घेतलेल्या जेन-जी कार्यकर्त्यांच्या समर्थनात प्रदर्शन करणाऱ्या 26 लोकांना रविवारी अटक केली.