रस्त्यांवर उतरले लोक : सिंधूचे नाव घेत मरण पत्करण्याची प्रतिज्ञा
वृत्तसंस्था/ कराची
सिंधू जल करार स्थगित करण्याच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतात निदर्शने सुरू झाली आहेत. सिंधू आम्ही गमावू देणार नसल्याच्या घोषणा तेथे देण्यात येत आहेत. मागील वर्षी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. शेजारी देशाने दहशतवादाला थारा देणे बंद करावे अशी रोखठोक भूमिका भारताने घेतली होती.
बिलावल भुट्टो झरदारींच्या नेतृत्वात पीपीपीने सिंधमध्ये मोर्चा आयोजित केला, यादरम्यान कार्यकर्त्यांनी कराची, हैदराबाद, थार, मीरपूरखास, लरकाना, शिकारपूर, नौशहरों फिरोज आणि दाडूमध्ये निदर्शने केली. ‘मरण पत्करू परंतु सिंधूवरील दावा सोडणार नाही’ असा आशयाचा नारा यावेळी देण्यात आला.
सिंधू नदी हा केवळ सिंधप्रांताचा मुद्दा नाही. तर पूर्ण पाकिस्तानवर प्रभाव पाडणारा आहे. सिंधू पाकिस्तानची जीवनरेषा आहे. सिंधूचे पाणी रोखले गेल्यास पाकिस्तानी शांत बसणार नाही असा इशारा सिंध प्रांताचे मंत्री सईद घनी यांनी दिला.
सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वळविले जात असल्याने सिंधमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे तेथे दोन मुख्य प्रांतांमध्ये मोठा संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तान सिंधूच्या पाण्याच्या मुद्यावर भारताला जबाबदार ठरवू पाहत असला तरीही तेथील पंजाब प्रांताला मिळणारे झुकते माप आता अन्य प्रांतांना खुपू लागले आहे.