ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत…
Tv9 Marathi July 14, 2026 03:45 PM

ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे समजते. ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची बैठक होणार आहे. तर चार्टड विमानाने खासदार आजच दिल्लीला रवाना होणार असल्याचे सांगितले जाते.

केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेटमंत्री व राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पद दिले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. तर राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेल्या ६ खासदारांमध्ये रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे सेनेतून 6 खासदार शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. यातील एकाची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यात केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत दौऱ्यात कुणाच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोषाची तयारी केल्याची माहिती आहे. तर उर्वरीत चार खासदारांना कोणत्या समितीवर घेण्यात येते याचीही चर्चा रंगली आहे. अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा झाली नसून अमित शहांचा वरदहस्त कोणवावर असेल अशा चर्चा आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.