Igatpuri : इगतपुरीमध्ये पावसाळी पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबातील महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, पाठलाग, हल्ला भितीदायक अनुभव
Tv9 Marathi July 14, 2026 04:45 PM

सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने धबधबे, डोंगर, नदी परिसरात जात आहेत. नाशिक इगतपुरीचं सौंदर्य पावसाळ्यात विशेष खुलून येतं. इगतपुरीमध्ये अनेक धबधबे नैसर्गिकरित्या प्रवाहित होतात. यंदा पावसाळा उशिराने सुरु झाला. मागच्या आठवड्यात रविवारी इगतपुरीच्या बाहुली डॅम परिसरात वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली. एका महिलेवर कमेंट पास करण्यात आली. त्यावरुन मोठा वाद झाला. या कुटुंबाच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पीडित महिलेने पत्रकार परिषद घेऊन तिच्यासोबत झालेला धक्कादायक प्रकार सांगितला.

“काल आम्ही फिरायला गेलो होतो. 2 वाजता पोहोचलो. मुलांनी एन्जॉय केलं. मी कपडे बदलायला गेले. माझ्यावर 2 जणांनी कमेंट पास केली. त्यानंतर पुन्हा परत त्यांनी माझ्यावर कमेंट केली” असं पीडित महिलेने सांगितलं. “माझे पती आले आणि त्यांनी जाब विचारला. समोर एका दुकानावर 8-10 जण उभे होते. त्यांनी हातपाई करण्याचा प्रयत्न केला” असा आरोप पीडित महिलेने केला.

एक जण आमच्या गाडीला लटकला

“पुढे एक Baleno गाडी आली. त्यातून एकाने हाताने गाडीच्या काचा फोडल्या. पुढे गेल्यावर त्यांनी आमच्या कारचा पाठलाग केला. रॉडने आमच्या गाडीवर हल्ला केला. पहिला हल्ला बाहुली डॅम परिसरात झाला. नंतर टोल नाक्यावर हल्ला केला” असा आरोप महिलेने केला. “दगड मारून हल्ला केला. शेवटी आम्ही ब्रॅकेट तोडून पळालो. नंतर ते आमच्या पुढे आले. मग आम्ही मुंबईच्या बाजूला पळालो. त्यातील एक जण आमच्या गाडीला लटकला. आम्ही थांबू सुद्धा शकत नव्हतो” असा भयानक अनुभव या महिलेने सांगितला.

..तर कोण मेलं असतं माहीत नाही

“मागून baleno पुन्हा आमचा पाठलाग करत होती. नंतर स्थानिक लोक उभे होते. आम्ही मदत मागितली. मागून आलेल्या मुलाने मला धरलं. त्याठिकाणी माझी सोन्याची चेन हरवली किंवा पडली. तिथून आम्ही थेट अंबड पोलिस स्टेशनला पोहोचलो. झिरो FIR ने गुन्हा दाखल झाला. काल स्पॉट पंचनामा झालाय. पोलिसांनी आम्हाला दोन गाड्यांचा कॉनवाय दिला. या गुंडांना मुली, बायका काहीच दिसत नव्हती. आम्ही जर तिथे थांबलो असतो तर कोण मेलं असतं माहीत नाही” असं महिलेने सांगितलं.

आम्ही 20-30 किलोमीटर मरण बघत आलो

“आम्ही 20-30 किलोमीटर मरण बघत आलो. खूप राग होता तर एकदा मारलं असतं. मात्र 30 किलोमीटर पाठलाग करून आमचा मर्डर करायचा होता. आम्ही पोलिसांना फोन केलं, मात्र रेंज नव्हती. केस दाखल करू नका यासाठी अज्ञाताने 10 लाखांची ऑफर दिली” असा दावा पीडित महिलेने केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.