नवी दिल्ली : देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळतंय. सरकारनं जाहीर केलेल्या महागाईच्या आकडेवारीनुसार रिटेल महागाई वेगानं वाढवत आहेत. आरबीआयनं महागाईसाठी 4 टक्क्यांची नियंत्रण रेषा निश्चित केली होती. सीपीआय डेटानुसार महागाईचा दर 4.38 टक्क्यावंर पोहोचला आहे. सलग सहाव्या महिन्यात महागाई वाढली आहे. याअगोदर मे महिन्यात देखील महागाई वाढली होती.
देशामध्ये महागाईचा भडका उडाला असून किरकोळ महागाई दर थेट 4.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. तब्बल 17 महिन्यांनंतर महागाईनं रिझर्व्ह बँकेची चार टक्क्यांची नियंत्रण रेषा ओलांडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चे तेलाचे दर कडाडल्याने आणि अन्नधान्याचे भाव वाढल्यानं महागाईचा फटका बसलाय.
मे महिन्यात रिटेल महागाईचा दर 3.93 टक्क्यांवर पोहोचला होता, जून महिन्यात त्यामध्ये 0.45 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून महिन्यात महागाईचा दर 4.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयनं महागाई निर्देशांकात मध्यम कालावधीसाठी 4 टक्क्यांची नियंत्रण रेषा निश्चित केली होती. या वर्षीच्या महागाईच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता सातत्यानं वाढ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. जानेवारीत महागाईचा दर 2.74 टक्के होता. फेब्रुवारीत 3.21 टक्के, मार्चमध्ये 3.40 टक्के, एप्रिलमध्ये 3.48 टक्के आणि मे महिन्यात महागाईचा दर 3.93 टक्के होता.
केंद्र सरकारकडून सोमवारी रिटेल महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये खाद्यपदार्थांमधील महागाईमध्ये वाढ होत त्याचा दर 5.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यात हा दर 4.78 टक्के होता. ग्रामीण भागात खाद्य महागाई 5.45 टक्के राहिली, शहरी भागात याचा दर 5.09 टक्के होता.
महागाईचा दर 4 टक्क्यांच्या पुढे गेल्यानं व्याज दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरबीआयची पतधोरण विषयक बैठक ऑगस्टमध्ये होणार आहे. त्या बैठकीत आरबीआयनं रेपो रेटमध्ये वाढ केल्यास कर्जाचे व्याज दर वाढू शकतात. व्याज दर वाढल्यास ईएमआय देखील वाढू शकतो. आता कर्जरादारांच्या नजरा आरबीआयच्या रेपो रेट संदर्भातील ऑगस्टमधील बैठकीकडे लागलं आहे. आरबीआयनं जूनमध्ये पतधोरण जाहीर करताना रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला होता. आता ऑगस्टच्या बैठकीत त्यात वाढ होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
50 लाखांपेक्षा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये तेलंगणामध्ये रिटेल महागाईचा दर 6.36 टक्के होता. तर, आंध्र प्रदेश आणि पुदुचेरीत हा दर 5.39 टक्के होता. तामिळनाडूत महागाईचा दर 5.24 टक्के, ओडिशात 5.15 टक्के होता. देशात सर्वात कमी महागाईचा दर नवी दिल्लीत 2.96 टक्के होता.