राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू, डेहराडून, पटना ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात काही भागात उष्णता वाढताना दिसली. राज्यात 20 जुलैनंतर पुन्हा एकदा पूर्ण मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला.
रायगड, पुणे, बीड, ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा घाटमाथा, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकाटाडासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज मोठा इशारा दिला. 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरावरील पाणी कपात तूर्तास टळली आहे. पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा होता पालिकेचा विचार. मात्र,गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.
अकोला जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून भर पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाची आकडेवारी सामान्य श्रेणीत दिसत असली तरी अनेक भागांत पावसाचे असमान वितरण झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.