>> आशिष बनसोडे
माझगावच्या जीएसटी भवनात अधिकारी-कर्मचारी अक्षरशः भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. सिलिंग कमकुवत झाल्याने ते पडू लागले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रस्तावित दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करणार का, असा संताप अधिकारी-कर्मचारी व्यक्त करत आहेत.
माझगाव येथे नऊ मजल्यांचे जीएसटी भवन असून त्यात ८० हून अधिक वेगवेगळे विभाग आहेत. या विभागांमध्ये जवळपास २२०० अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. या इमारतीमधील असंख्य विभागात सिलिंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिमेंटचे प्लॅस्टर कधीही सिलिंगची साथ सोडून खाली पडत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच काम करावे लागत आहे.
या इमारतीमधील अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी राज्य शासनाने ७१ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मार्च २०२६ मध्ये याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे; परंतु तरीही इमारतीमधील अंतर्गत दुरुस्तीचे बरेचसे काम सुरूच करण्यात आलेले नाही. शिवाय इमारतीमधील तीन लिफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाकडून आवश्यक निधी मंजूर झाला आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम का सुरू केले जात नाही? एखादी घटना घडण्याची वाट पाहिली जातेय का, असा संताप अधिकारी-कर्मचारी व्यक्त करत आहेत. | वेळोवेळी सुरक्षेच्या सूचना आम्ही देत आहोत. महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करू असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात





