Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले
GH News July 20, 2026 03:16 PM

Jantar Mantar Protest: सध्या देशात जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवला असल्याचा आरोप केला आहे. सोबत त्यांनी काचा तुटलेली एक कार देखील आणल्याचा आरोप केला आहे. तसेच आता लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या टाकल्यानंतरही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले आहे.

कॉकरोच जनता पार्टी (CJP) आज (२० जुलै) संसदेकडे मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली आहे. तरीही जंतर-मंतर येथे सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जमले आहेत. CJP चे संस्थापक अभिजीत दीपक यांनी स्पष्ट केले की, “आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून कोणतीही अनुचित कृती होणार नाही. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण राहील, जेणेकरून आंदोलनाची प्रतिमा बिघडू नये.”

दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली कार

जंतर-मंतर परिसरात अचानक दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनी या दोन्ही वाहनांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, “जंतर-मंतरवर दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाचा नेमका काय डाव आहे? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याची तयारी चालू आहे का?” असा सवाल केला आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे. आधीच जंतर-मंतरवर दगड भरलेला ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून ठेवण्यात आली आहे. लवकरच मीडिया याची बातमी चालवेल की, आंदोलकांनीच ही वाहने तोडफोड केली.” CJP ने हा प्रकार दिल्ली पोलिसांचा आंदोलनाला बदनाम करण्याचा कट असल्याचा दावा केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.