कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
माधव दिपके July 28, 2026 04:13 PM

धाराशिव :  शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची सरकारने घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीच्या यादीत दोन लाखांपर्यंत कर्ज माफ होईना. धाराशिवच्या (Shetkari Karjmafi) गंधोरा गावात कर्जमाफीच्या यादीत 233 शेतकऱ्यांना (Shetkari Karjmafi) लाभ झाला, यादीतील 80% शेतकऱ्यांचा कर्जमाफीत गोंधळ झाल्याचं दिसून आलं आहे. प्रत्यक्षात एक लाख 54 हजार कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना फक्त 94 हजार कर्जमाफीचा मिळाला लाभ. सरकारचे दोन लाखांची कर्जमाफी हा फक्त जुमला आहे का?, कारण प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही, त्यामुळे कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Shetkari Karjmafi) शेतकऱ्यांचा बँकेत फेऱ्या सुरू आहेत, कर्जमाफी फसवी असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कर्ज माफीच्या यादीतील रक्कम केवायसीवरील रक्कम आणि कर्जांच्या रकमेमध्ये तफावत दिसून येत आहे.(Shetkari Karjmafi)

Shetkari Karjmafi:  हिंगोलीतही तीच परिस्थिती

हिंगोली जिल्ह्यातल्या कडोळी गावचे शेतकरी प्रमोद गाजरे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलं होतं. शेतात अपेक्षित उत्पादन झाल्याने त्यांना पीक कर्ज परतफेड करणे शक्य झालं नाही, त्यामुळे ते पीक कर्ज थकीत राहिले आहे. परिणामी राज्य शासनाने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये प्रमोद गाजरे यांचं नाव आलं असून कर्जमाफीची यादीमध्ये त्यांच्या नावे 61 हजार रुपये कर्ज माफ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर प्रमोद गाजरे ही केवायसी करण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर गेले असता त्या ठिकाणी केवायसी करत असताना त्यांच्या नावे एक लाख 31 हजार रुपये कर्ज माफ केलं जाणार असल्याचे तर बँकेत जाऊन गाजरे यांनी थकीत कर्जाची चौकशी केली असता बँकेकडे 82 हजार रुपये कर्ज थकीत आ,हे त्यामुळे नेमकं कर्जमाफीची रक्कम किती मिळणार आहे, आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये केवायसी करायची का? असा प्रश्न प्रमोद गाजरे यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे

Shetkari Karjmafi: हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या आकड्यामध्ये गोंधळ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे, या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 44 हजार 177 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे, या कर्जमाफीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून शासन माफ करत असलेली कर्ज केवायसी मध्ये दाखवली जाणारी कर्जाची रक्कम आणि बँकेमध्ये थकीत कर्ज या तीनही रकमेमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. कर्जमाफीच्या यादीवर जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या तुलनेमध्ये कमी असून केवायसी करताना दाखवली जाणारी रक्कम सुद्धा कमीच आहे, त्यामुळे उर्वरित कर्जाची रक्कम कोणी भरायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान कर्जमाफीची रक्कम निश्चित होत नाही तोपर्यंत किती कर्ज माफ होणार आहे याला स्पष्टता येणार नाही त्यामुळे आता इ केवायसी करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे, त्यामुळे शासनाने या कर्जमाफीच्या रकमेमध्ये असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

Shetkari Karjmafi:  धाराशिवमध्ये शेतकऱ्याचं एक लाख 54 हजार 738 रुपये थकीत कर्ज 

गंधोरा येथील जीवन विष्णू पाटील यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचे एक लाख 54 हजार 738 रुपये थकीत कर्ज आहे. मात्र कर्जमाफीच्या यादीत त्यांना फक्त 94 हजार 427 रुपयांचा लाभ मिळाला आहे. सरकारकडून जाहीर केलेल्या दोन लाखाच्या कर्जमाफीचा लाभ जीवन पाटील यांच्यासह गंधोरा येथील शेकडो शेतकऱ्यांना मिळाला नाही. 60 हजार रुपये भरल्याशिवाय 94 हजार माफ होणार नाही असे बँक अधिकारी सांगत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. मुलांचे शिक्षण, पेरणी झालेली नाहीये, अशा परिस्थितीत पैसे भरता येणार नाहीत, त्यामुळे कर्जमाफीचा आनंद नाही असंही ते म्हणाले 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.