झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकार का मारले? स्वत:च केला खुलासा
GH News July 24, 2026 05:12 PM

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयात सर्वात मोठं योगदान राहिलं ते वैभव सूर्यवंशीचं.. वैभव सूर्यवंशीने या सामन्यातील पहिल्या तीन चेंडूवर संयम दाखवला. पण चौथ्या चेंडूनंतर आपल्या भात्यातून चौकार आणि षटकार काढले आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशीने या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. वैभवने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि 19व्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. पण आक्रमक खेळीचं वर्णन करताना वैभव म्हणाला की, हरारेच्या मैदानात उतरल्यानंतरच धावा करेन अशी जाणीव झाली होती. तसंच या सामन्यात घडलं देखील.. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक आई वडील आणि प्रशिक्षकांना समर्पित केलं आहे. चला जाणून घेऊयात या आक्रमक खेळीनंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला ते…

वैभव सूर्यवंशी म्हणाला की…

वैभव सूर्यवंशीने आपल्या अर्धशतकी खेळीचं विश्लेषण करताना सांगितलं की, ‘क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या सामन्यात अशी खेळी केल्याने पुढच्या सामन्यांसाठी आत्मविश्वास आणखी दुणावतो. या सामन्यात मी पूर्णपणे एकाग्र होतो आणि मला माझ्या सामर्थ्यावर पू्र्ण विश्वास होता. मी झालं पहिलं अर्धशतक हे माझ्या कुटुंबाला, प्रशिक्षकांना आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.’ वैभव सूर्यवंशीने पुढे सांगितलं की, ‘हरारेचं मैदान मला खूप आवडतं आणि काही मैदानं अशी आहेत की तुम्हाला लगेच भावतात. मी जिथे कुठे खेळतो, तिथे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. संघासाठी योगदान देणं आणि सर्वोत्तम करणं हे माझं काम आहे.’

वैभव सूर्यवंशीच्या नावावर विक्रमाची नोंद

वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याने कामगिरी दरम्याने चार षटकार आणि चार चौकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याला मान मिळाला आहे. इतकंच काय तर कमी वयात जलद अर्धशतकी खेळीचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.