परीक्षण – शिक्षकांच्या व्यथांचा कादंबरीमय आविष्कार
Marathi July 26, 2026 10:25 AM

<< श्रीकांत आंब्रे

शाळा-कॉलेजातील शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपण्याचे सरकारी धोरण सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर विनाअनुदानित शिक्षक आणि प्राध्यापकांना नोकरीत कायम न करता, नोकरीतील आवश्यक सुविधा आणि फायदे न देता त्यांचे भविष्य टांगणीला लावण्याचे काम अनेक शिक्षण संस्था आणि शिक्षण सम्राट सरकारी कृपाछत्रछायेखाली राहण्यासाठी करीत असतात. न्याय्य हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या या विनाअनुदानित शिक्षकांच्या लढ्याचे परिणाम निबर मनोवृत्तीच्या प्रशासनावर होत नाहीत. प्रत्येक वेळी आश्वासने देऊन त्यांची बोळवण केली जाते. तुटपुंज्या पगाराचे दुष्परिणाम त्यांच्या संसारावर होतात. आर्थिक घडी विस्कटल्यामुळे त्यातील अनेकांच्या होणाऱ्या आत्महत्या, घरात होणारा छळ, मोडून पडणारे संसार, मुलांच्या शिक्षणाची होणारी आबाळ, अंधःकारमय भवितव्य यांसारख्या समस्यांशी संघर्ष करीत उदासवाणे जीवन जगणाऱ्या अशा स्त्री-पुरुष शिक्षक – प्राध्यापकांच्या जगाचा नेमका वेध घेणारी ‘कोल्हाळ’ ही ग्रामीण पार्श्वभूमीवरील कादंबरी श्वेतल परब या लेखिकेने कसलाही प्रचारकी थाट न आणता कलात्मक जाणिवेने साकार केली आहे.

‘बिनपगारी फुल अधिकारी’ या पद्धतीचे या शिक्षकांचे शाळा-कालेजातील वेठबिगारासारखे जीवन आणि त्यामुळे त्यांच्या एकूण जगण्यावर होणारे विपरीत परिणाम याचे चित्रण एका दीर्घ कथानकाद्वारे लेखिकेने केले आहेच, पण त्याचबरोबर या कथित शिक्षण सम्राटांनी नफेखोर वृत्तीतून आपल्या शिक्षण संस्थांद्वारे सुरू केलेल्या विनाअनुदानित शाळा-कालेजांमधून उच्चविद्याविभूषित शिक्षकांचे आयुष्यही कसे सत्त्वहीन करून टाकले आहे याचे विदारक दर्शन कादंबरीत प्रभावीपणे घडवले आहे.

आत्मनिवेदनात्मक पद्धतीने सांगितलेल्या या कहाणीतून या समस्येशी निगडित अनेक पैलू उजेडात येतात. आपल्या न्याय्य हक्कांसाठी सत्तेशी संघर्ष करूनही निराशा, उद्विग्नता, हतबलता, आत्मक्लेश अशा मानसिक आवर्तात सापडलेल्या या शिक्षकांच्या आयुष्याच्या साऱ्याच अंधःकारमय दिशा मग अधिक स्पष्ट दिसू लागतात. नव्या पिढ्यांचे आयुष्य घडवणारे हात कधी गळफासात अडकतात तर कधी त्यांची माथी दिवास्वप्न पाहत भ्रमिष्ट होत जातात. त्यातून ज्ञानदानाची ही पवित्र व्यवस्था किती भ्रष्ट आणि कुरूप झाली आहे याचे प्रत्ययकारी चित्रण कादंबरीत पाहायला मिळते. लेखिका श्वेतल परब यांनी आपल्या प्रगल्भ साहित्यिक दृष्टीतून अनेक कंगोरे असलेल्या या विषयाचा नेमका वेध घेतल्याचे जाणवते. साधीसोपी वर्णनशैली, नाट्यपूर्ण प्रसंग, मालवणी बोलीचा काही पात्रांच्या तोंडून केलेला खुमासदार वापर यांसारख्या साहित्य गुणांमुळे ही कादंबरी अधिक उठावदार होते आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा अधिक बोलक्या होतात.

घरात एका शाळकरी मुलाच्या शंभर कळा सांभाळताना पालकांच्या नाकी नऊ येतात. शिक्षकांची मात्र शाळेत आठ तास शंभर मुलांच्या सहस्र करामतींना तोंड देताना किती दमछाक होत असते याची कल्पना समाजाला येत नाही. तरीही या शिक्षकांची ससेहोलपट होते. तडकाफडकी निलंबन, बदली, पदावनती, अपमान हे प्रकार मनमानी पद्धतीने घडत असतात. अशा कादंबरीच्या रूपाने समाजाला या शिक्षकांची जगण्याची तडफड आणि केविलवाणी अवस्था नक्कीच समजू शकेल. कादंबरीत वास्तव आणि कल्पनारम्यतेचा सुरेख मेळ लेखिकेने साधला आहे. विनाअनुदानित धोरण म्हणजे शिक्षकांच्या वाट्याला आलेली नवअस्पृश्यताच असल्याची जाणीव वाचकांना नक्कीच होईल. कादंबरीचा प्रतीकात्मक आशय गडदपणे अधोरेखित करणारे मिलिंद कडणे यांचे मुखपृष्ठही बोलके आहे.

कादंबरी ः कोल्हाळ

लेखक: श्वेताल परब

प्रकाशक: लोकगीतगृह, प्रभादेवी

पृष्ठे ः 204किंमत: रु. ३५०/-

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.