सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन
abp majha web team July 26, 2026 11:43 AM

Jana Nayagan Box Office Collection: सेन्सॉर बोर्डाशी मतभेद आणि तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचा बहुचर्चित 'जन नायकन'  हा चित्रपट गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झाला. 'थलपती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय थलपतींचा हा अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट मानला जात असल्याने चाहत्यांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती.हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.  या चित्रपटाने केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर जागतिक स्तरावरही दमदार कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जागतिक बॉक्स ऑफिसवर 172 कोटींची कमाई

चित्रपटाच्या यशात सुरुवातीचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि 'जन नायकन'ने याच कालावधीत जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरातून तब्बल 172 कोटी रुपयांची कमाई केली आहे.शनिवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 50 कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन केलं. 

लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा?

सध्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड पाहता, एक्स्टेंडेड ओपनिंग वीकेंड संपेपर्यंत 'जन नायकन' 200 कोटी रुपयांचा जागतिक टप्पा सहज पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकारात्मक प्रतिसाद आणि मजबूत वर्ड ऑफ माउथमुळे हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती ठरताना दिसत आहे.

जगभरातही दमदार कामगिरी

कोणत्याही चित्रपटाच्या जागतिक यशात परदेशातील कमाईचा मोठा वाटा असतो. 'जन नायकन'ने आतापर्यंत ओव्हरसीज मार्केटमध्ये 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून, येत्या काही दिवसांत या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच काय, तर थलपती विजय यांच्या 'जन नायकन'ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत यंदाच्या मोठ्या यशस्वी चित्रपटांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.