भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारत चांगली सुरूवात करेल अशी अपेक्षा होती. मात्र अभिषेक शर्माने या सामन्यातही निराशा केली. अभिषेक शर्माने 8 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार मारून बाद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर बाद झाल्याने त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म गेल्या काही दिवसात खूपच ढासळल्याचं दिसून आलं आहे. 2026 वर्ष त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी उताराचं ठरलं आहे. काही मालिकांमध्ये अभिषेक शर्मा पूर्ण फेल गेला आहे. वर्ष 2026 मध्ये अभिषेक शर्माने एकूण 18 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 190.19 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या. टी20 वर्ल्डकप 2026, आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. हाच कित्ता झिम्बाब्वे दौऱ्यातही गिरवत आहे.
अभिषेक शर्माची झिम्बाब्वे दौऱ्यातही बॅट काही चालली नाही. पहिल्या सामन्यात 1 धाव करून बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात 8 या एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यामुळे त्याची प्लेइंग 11 मधील जागा डळमळीत झाली आहे. त्याची जागा घेण्यासठी संघात प्रभसिमरन सिंग आणि सूर्यांश शेडगे हे दोन पर्याय आहेत. त्यात प्रभसिमरन सिंगला संधी मिळू शकते. कारण भारताच डावं उजवं कॉम्बिनेशन ओपनिंगला उतरू शकते. प्रभसिमरन उजवा, तर वैभव डावखुरा फलंदाज आहे. ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाची लाईन आणि लेन्थ बिघडू शकते. प्रभसिमरन पॉवरप्लेच्या 6 षटकात अत्यंत आक्रमकपणे खेळतो.त्यामुळे भारताला वेगवान सुरुवात मिळू शकते.तर सूर्यांश हा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र त्याला संधी मिळणं कठीण आहे.