धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर (Resignation) राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. आंदोलक विद्यार्थी आणि सरकारमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी झालेल्या या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, “आंदोलकांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा दिला. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मी आभार मानतो,” असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीतील आणि पडद्यामागील घडामोडींवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, “युवा पिढीने शांततेने आणि संयमाने आपल्या भावना देशातील नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आले. मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो. त्यांना विनंती केली की, लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. संवाद न ठेवण्याचे दुष्परिणाम होत असतात. तुम्ही संवाद सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेतले पाहिजे. त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रीमंडळ आणि तुमचे दोन-तीन कलिग यांच्याशी चर्चा करा. अभिजीत आणि त्यांचे सहकारी यांच्याशी आम्ही बोलणे केलेले आहे. त्यांनाही आम्ही सांगितलेले आहे की, सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल. बोलायचे नाही असा हट्ट धरू नका, असे मी पंतप्रधान मोदींना सांगितले आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती. त्यामुळे माझं जे काही नरेंद्र मोदींसोबत बोलणं झालं, त्याचा परिणाम आज दिसला आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आज झाला आहे,” असे त्यांनी म्हटले.
दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. यावर शरद पवार म्हणाले की, मी युवा पिढीचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीमार, अश्रुधूर हे प्रकार जर टाळले असते तर अधिक चांगले दिसले असते,” असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा