नवी दिल्ली : धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा दिलेला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर स्वीकारला आहे. नीट (NEET) पेपर फुटीप्रकरणी आणि ढिसाळ शिक्षण व्यवस्थेविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरपासून ते पाटण्यापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी हे मोठे पाऊल उचलले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणखात्याचा प्रदभार आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाल्याची बातमी येताच ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुण ढोल-ताशे वाजवत नाचताना आणि विजयोत्सव साजरा करताना दिसले. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त सीजेपीच्या इतरही प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, ज्यामध्ये पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचा समावेश आहे. 20 जुलै रोजी दिल्लीत संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते आणि सरकार पूर्णपणे बॅकफुटवर आले होते. अखेर पंतप्रधान मोदींनी स्वतः मध्यस्थी करत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत दिलासा दिला.
सरकार आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) यांच्यात तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला. 24 जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) मध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता सीजेपीकडूनही आपले आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट करत लिहिले की, “मी पहिल्या दिवसापासून या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. गेल्या 10 दिवसांतील घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. जंतर-मंतरवर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये आणि देशाची एकता अबाधित राहावी, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशसेवेची संधी मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
ही बातमी वाचा: