पाऊलखुणा – इतिहासाचे स्मरण पर्यावरणाशी निष्ठा
Marathi July 26, 2026 08:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> शीतल धनावडे

ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड मार्गावर हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनकडून नुकतीच 75 वी मोहीम काढण्यात आली होती. या मार्गाने केलेला हा प्रवास बाजीप्रभू देशपांडे यांच्या अजोड परामाचा, त्यागाचा आणि इतिहासाचा जिवंत अनुभव देत पर्यावरणाचा अमूल्य संदेश देणाराही ठरला.

ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड हा केवळ एक ट्रेक नसून छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अजोड परामाचा, त्यागाचा आणि इतिहासाचा जिवंत प्रवास आहे. दरवर्षी दि. 12 व 13 जुलै रोजी हजारो दुर्गप्रेमी आणि शिवभक्त या ऐतिहासिक मार्गावरून चालत जाऊन त्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करतात. गेली 40 वर्षे या मार्गावर मोहीम काढणाऱया हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनकडून यंदा नुकतीच 75 वी मोहीम काढण्यात आली. याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांच्या अद्वितीय परामासमोर नतमस्तक होऊन इतिहासाचे स्मरण करण्यासह या ऐतिहासिक मार्गावर पर्यावरण संवर्धनाचीही परंपरा जोपासली गेली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या परामाचा इतिहास आपल्याला नेहमीच स्फूर्ती देत आला आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक मार्गांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी आणि त्याचसोबत निसर्गाचे रक्षण करण्यासाठी ‘हिल रायडर्स’ परिवार गेल्या 40 वर्षांपासून अविरतपणे कार्य करत आहे. ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड हा मार्ग केवळ एक ट्रेकिंग रूट नसून तो महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार आहे.ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला दिलेल्या सिद्धी जोहरच्या वेढय़ातून किल्ले विशाळगडकडे जाताना छत्रपती शिवराय आणि त्यांचे निष्ठावंत मावळे याच मार्गाने शत्रूशी झुंज देत निघाले. त्या वेळची घोडखिंड आणि आताच्या पावनखिंडीकडे शत्रूला थोपवून ठेवण्यासाठी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह मावळ्यांनी मोठा रणसंग्राम केला.त्यांच्या या संघर्षाने पावन झालेल्या या भूमीवरून चालणे हा प्रत्येक शिवभक्तासाठी एक भावनिक आणि अभिमानास्पद क्षण असतो.

विविध शिवप्रेमी मोहिमेच्या सुरुवातीस या मार्गावरील पर्यावरण आणि शेतकऱयांच्या शेतीचे काही प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये…’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाच्या अंमलबजावणीची छाप या मोहिमांमधून दिसून येऊ लागली. या ऐतिहासिक मार्गावर ट्रेकर्स आणि पर्यटकांची गर्दी वाढत असली तरी तिथल्या पर्यावरणाचा ऱहास होऊ नये यासाठी ‘हिल रायडर्स’ परिवाराने मोहिमेदरम्यान निसर्गाची हानी टाळण्यासाठी आणि पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी राबविलेले उपामाचे अनुकरण इतरही शिवप्रेमी संघटना करू लागल्या आहेत. या मार्गावर विविध प्रकारच्या देशी झाडांचे वृक्षारोपण केले जाते, जेणेकरून स्थानिक जैवविविधता टिकून राहील. अनेक वर्षांपासून हिल रायडर्स परिवारातील सदस्य घरूनच ‘सीड बॉल्स’ तयार करून आणतात आणि प्रवासादरम्यान योग्य जागेवर ते टाकतात, ज्यामुळे पावसाळ्यात तिथे नैसर्गिकरीत्या झाडे उगवण्यास मदत होते.

पूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून जंगलात काही प्रमाणात झाडतोड केली जायची. त्यांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यात आल्याने आता स्थानिक लोकही जंगलाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. प्लास्टिक कचऱयामुळे निसर्ग नष्ट होण्याचा मोठा धोका ओळखून या मार्गावर प्लास्टिक कचरा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने या मार्गावर प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवला जातो. मोहिमेत सहभागी तरुणवर्ग आणि पर्यटकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून पर्यावरण रक्षणाची शपथ दिली जाते. पूर्वी मार्गाची ओळख पटवण्यासाठी वा वाट लक्षात राहण्यासाठी झाडांवर खुणा केल्या जायच्या. आता मार्गाच्या मार्किंगसाठी कोणत्याही झाडावर खिळे ठोकून पाटी लावण्यासह झाडांची साल काढणे, रंगांचे पट्टे मारणे वा इतर प्रकारच्या नैसर्गिक हानी पोहोचवणाऱया खुणा करणे पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. यासाठी ठिकठिकाणी छोटे-छोटे दिशादर्शक स्तंभ बसवण्यात आले आहेत. एक सुसंस्कृत आणि जबाबदार दुर्गभ्रमंती दिशादर्शक स्तंभांची ही नवी व्यवस्था इतिहास आणि पर्यावरण या दोन्हीचा समतोल राखणारी आहे. शिवरायांच्या या पावन मार्गावर चालताना निसर्गाला कोणतीही इजा न पोहोचवता पर्यावरणपूरक पद्धतीने दुर्गभ्रमंती करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे आणि ट्रेकर्सचे आद्य कर्तव्य आहे. हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांच्यासह गिर्यारोहक विनोद कांबोज आदींचे परिश्रम महत्त्वाचे आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.