Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय (Low Pressure Area) झाले असून येत्या दोन दिवसात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर पूर्व विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत उणे 15 टक्के पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात 01 जुलै ते 25 जुलै दरम्यान, सरासरीच्या उणे 3 टक्के पाऊस झाला. पुढील दोन दिवस राज्यभरात पावसाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. दक्षिण कोकण गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी पुढील दोन दिवस, तळ कोकणासह कोकण किनारपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 25, 2026
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
हवामान विभागाने आज पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला असून, रायगड रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा तसेच ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जुलै महिन्यात महाराष्ट्रभरात काही जिल्हे वगळता बहुतांश ठिकाणी पावसाने हुलकावणीच दिली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत उणे 33% कमी पाऊस झालाय. तर विदर्भात पुढे 26 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत + 22 टक्के पावसाची नोंद झाली. तर कोकणात +4% पाऊस झाला. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टीची नोंद होताना दिसते. यामागे अनेक कारणे असून वातावरणातील, मान्सूनच्या प्रणालीमध्ये झालेले बदल यासाठी कारणीभूत असून एल निनो, ला निना यासारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते, प्रदूषण या सगळ्याचा परिणाम पावसावर होतोय.