अकोला क्राईम न्यूज: अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद (Mohasin Shaikh) यांच्या मृत्यू प्रकरणाने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे (Mangesh Kale) यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मंगेश काळे यांच्या अटकेसाठी रात्री खदान पोलीस स्टेशनमध्ये मृतकाच्या कुटुंबीयांनी धडक दिली. (Akola news)
23 जुलै रोजी संध्याकाळी अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या दुचाकीला मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होतीय. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोहसीन यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र, हा अपघात नसून सुनियोजित घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. विशेष म्हणजे, शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीच वाहनाने धडक देत मोहसीन यांची हत्या केल्याचा थेट आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणात त्यांनी माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. मंगेश काळे हे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख असून माजी नगरसेवक आहेय. सध्या त्यांच्या पत्नी सुरेखा काळे या महापालिकेत नगरसेविका आहेत. घटनेनंतर संतप्त नातेवाईक, समर्थक आणि नागरिकांनी खदान पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत निष्पक्ष तपासाची मागणी केली. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. हा अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे. सध्या या प्रकरणातील आरोप हे कुटुंबीयांकडून करण्यात आलेले असून त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे सध्या अकोला जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.
आणखी वाचा