Bollywood Director B. R. Ishara Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक दिग्गज दिग्दर्शक (Director) होऊन गेले, ज्यांनी रुपेरी पडद्यावर अनेक अजरामर सिनेमे केले आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज अशाच एका दिग्गज दिग्दर्शकाबाबत आपण माहिती घेणार आहोत, ज्यानं सेटवर चहा देता-देता नशीब आजमावलं आणि थेट दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन सहभागी झाला. या दिग्गज दिग्दर्शकानं हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film Industry) अशा विषयांवर सिनेमे बनवले, ज्या विषयांवर एखादी व्यक्ती मोकळेपणानं बोलायलाही कचरत असे. या सिनेमांमुळे अनेक वाद निर्माण झाले, तरी हा दिग्दर्शक स्वतःच्या दृष्टीकोनावर ठाम राहिला. पडद्यामागचा एक दिग्गज बनण्यापूर्वी बी. आर. इशारा (B. R. Ishara) यांनी सिनेमाच्या सेटवर चहा देण्याचं कामही केलं होतं, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. हाच संघर्ष कालांतरानं त्यांची सर्वात मोठी ताकद ठरला.
बी. आर. इशारा (Director B. R. Ishara) यांचा जन्म 7 सप्टेंबर 1934 रोजी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उना जिल्ह्यात झाला. त्यांचं मूळ नाव रोशन लाल शर्मा... काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना तरुण वयातच मुंबईत (Mumbai) घेऊन आली. सुरुवातीच्या काळात पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मिळेल ती छोटी-मोठी कामं केली. असं म्हटलं जातं की, मुंबईत आल्यानंतर त्यांना 'बाबू' हे नाव मिळालं. पुढे त्यांनी आपल्या नावात 'राम' जोडलं आणि लेखक बनल्यावर 'इशारा' हे टोपणनाव स्वीकारलं, त्यानंतर ते 'बाबू राम इशारा' (Babu Ram Ishara) या नावानं ते ओळखले जाऊ लागले.
मुंबईतील प्रवास सोपा नव्हता (Director B. R. Ishara Struggle Life)
बी. आर. इशारा यांचा मुंबईतील प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांनी सिनेमाच्या सेटवर 'टी-बॉय' म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि अभिनेते, तंत्रज्ञांना चहा देण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनी सेटवर 'स्पॉट बॉय' म्हणूनही काम केलंय आणि सेटवरील लहान-मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ही कामं करत असताना त्यांनी सिनेमा निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया जवळून पाहिली. कॅमेऱ्याच्या मागे चालणाऱ्या कामांची त्यांना समज आली आणि हळूहळू त्यांची पटकथा लेखनात रुची वाढली. काही काळानंतर त्यांनी लेखकांना मदत करण्यास सुरुवात केली आणि कालांतरानं स्वतः कथा लिहायला सुरुवात केली. याच अनुभवानं त्यांच्यासाठी दिग्दर्शनाच्या विश्वात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला.

बी.आर. इशारा यांच्या कारकिर्दीची सुरुवात (B. R. Ishara Career Graph)
बी. आर. इशारा यांनी 1964 मध्ये 'आवारा बादल' सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं, पण त्यांना खरी ओळख 1970 मधील 'चेतना' सिनेमामुळे मिळाली. हा सिनेमा एका देहविक्री करणाऱ्या महिलेच्या आयुष्यावर आधारित होता. त्या काळात अशा विषयावर सिनेमा बनवणं ही एक मोठी जोखीम मानली जात असे. या सिनेमाची कथा आपल्या काळाच्या खूप पुढची होती, यामुळे बरीच चर्चा आणि वाद निर्माण झाले असले, तरी प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला. या सिनेमामुळे अभिनेत्री रेहाना सुलतान प्रकाशझोतात आल्या, पुढे 1984 मध्ये बी. आर. इशारा यांनी त्यांच्याशी विवाह केला.

नव्या कलाकारांवर दृढ विश्वास
बी. आर. इशारा यांचा नव्या प्रतिभेवर नेहमीच विश्वास होता. त्यांनी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना 'चरित्र' सिनेमाद्वारे अभिनयाची पहिली संधी दिली. या सिनेमानं अभिनेत्री परवीन बाबी आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांनाही सुरुवातीच्या काळात ओळख मिळवून दिली. त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, डॅनी डेंझोंगपा, विजय अरोरा, राज किरण आणि रझा मुराद यांच्यासह अनेक कलाकारांना सुरुवातीच्या काळात महत्त्वाच्या संधी दिल्या.
35 फिल्म्सचं दिग्दर्शन
1964 ते 1996 या काळात बी. आर. इशारा यांनी सुमारे 35 सिनेमांचं दिग्दर्शन केलं. त्यांच्या कारकिर्दीतील प्रमुख सिनेमांमध्ये 'मिलाप', 'मान जाइये', 'एक नजर', 'जरूरत', 'लोग क्या कहेंगे', 'घर की लाज', 'वो फिर आएगी' आणि 'सौतेला भाई' यांचा समावेश आहे. त्यांचा 'वो फिर आएगी' सिनेमा 'सिल्व्हर ज्युबिली' हिट ठरला, तर 'सौतेला भाई' सिनेमाला समीक्षकांकडून मोठी दाद मिळाली. जरी त्यांच्या अनेक सिनेमांवर त्याकाळी 'बी-ग्रेड' (B-grade) असल्याचा ठपका ठेवून टीका झाली होती, तरी नंतरच्या काळात सिनेतज्ज्ञांनी हे मान्य केलं की, त्यांची दृष्टी त्यांच्या काळाच्या खूप पुढे होती.
आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी सिनेमांची निर्मिती करणं बऱ्याच अंशी थांबवलं होतं. दीर्घ आजारानंतर 24 जुलै 2012 रोजी मुंबईतील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यावेळी ते 77 वर्षांचे होते.