नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
तुषार कोहळे July 27, 2026 10:43 AM

MPSC Paper leak: देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, 22 मार्च 2025 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर व्हायरल झाली होती. तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्येही विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat), कॉल रेकॉर्ड (Call Records) आणि इतर डिजिटल पुरावे (Digital Evidence) यांची फॉरेन्सिक (Forensic) तपासणी करण्यात यावी, तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPSC Paper leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले आहे. प्राप्त तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPSC Paper leak: 'केवळ एका पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न'

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी एक्सवर या प्रकरणाबाबत पोस्ट करत म्हटले आहे की, MPSC औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज MPSC औषध निरीक्षक परीक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत आहे. जर हे सत्य असेल, तर हा केवळ पेपरफुटीचा विषय नाही, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे.

एका प्रश्नपत्रिकेची किंमत काही पानांची नसते. तिच्यामागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट, त्याग आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि MPSC वरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आहे.

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे. आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थी कोणतीही सहानुभूती मागत नाहीत ते फक्त त्यांच्या कष्टाचा न्याय मागत आहेत. MPSC वरील विश्वास टिकवायचा असेल, तर सत्य बाहेर आलेच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Exam Reform Bill 2026 Narendra Modi NEET Paper Leak: 10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड...पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये काय काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.