आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''
esakal July 27, 2026 10:45 AM

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वाशीम येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी, "लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये महिलांची गर्दी वाढते. महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात की पैसे कधी जमा होणार?" असे विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे रविवारी (२६ जुलै) वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. महिला व बालविकास विभागाच्या अहिल्या भवनच्या लोकार्पणानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठांमधील व्यवहार वाढत असल्याचे सांगितले. तसेच व्यापारीदेखील योजनेचे पैसे कधी जमा होणार, याची चौकशी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ladki Bahin Yojana Raigad Women : 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल 50 हजार महिलांची नावं वगळली; 'ही' आहेत महत्त्वाची कारणं, यादीत तुमचं तर नाव नाही ना?

मात्र, या वक्तव्यावर काही महिलांनी आक्षेप घेतला आहे. योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही अनेक गरीब आणि गरजू महिलांसाठी मोठा आधार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दैनंदिन घरखर्च, मुलांच्या गरजा, औषधोपचार तसेच इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग केला जातो. त्यामुळे या पैशांकडे केवळ खरेदी किंवा शॉपिंगच्या दृष्टीने पाहणे योग्य नसल्याची भावना काही महिलांनी व्यक्त केली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

जिजाऊ ब्रिगेडच्या वाशीम जिल्हाध्यक्ष सुरेखा आरु यांनीही मंत्री तटकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. दरमहा मिळणारे पंधराशे रुपये त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार ठरतात. त्यामुळे या योजनेबाबत बोलताना लाभार्थी महिलांच्या वास्तव परिस्थितीचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.