कर्जमाफीच्या यादीत नाव नव्हतं... बँकेतून घरी परतलेल्या शेतकऱ्याने जीवन संपवलं; यवतमाळमधील मन हेलावणारी घटना
निलेश फाळके July 27, 2026 12:43 PM

Farmers Loan Waiver: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील राळेगाव (Ralegaon) तालुक्यातील भांब (Bhamb) गावात कर्जमाफी (Loan Waiver) योजनेच्या यादीत नाव नसल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. राजू बापुराव चुड्डके (वय 49) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. आपले नाव या यादीत असेल आणि कर्जातून दिलासा मिळेल, या आशेने राजू चुड्डके बँकेत गेले होते. मात्र, यादीत आपले नाव नसल्याचे समजताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.

Farmers Loan Waiver: यादीत नाव नसल्याने झाले निराश

आधीच दुष्काळ (Drought), शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती तसेच विविध संस्थांचे कर्ज यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. अशा परिस्थितीत कर्जमाफी हाच शेवटचा आधार असल्याची भावना त्यांच्या मनात होती. मात्र, लाभार्थी यादीत नाव नसल्याने ते प्रचंड निराश झाले.

Farmers Loan Waiver: जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1 लाखाचे कर्ज

राजू चुड्डके यांच्या नावावर मौजा मुधापूर उजाड येथे 1 हेक्टर 39 आर शेती आहे. त्यांच्या आईच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज होते. याशिवाय चार मायक्रो फायनान्स कंपन्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे खासगी कर्ज आणि घरकुलासाठी घेतलेले कर्जही त्यांच्या कुटुंबावर असल्याची माहिती समोर आली आहे.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यानं जीवन संपवलं

बँकेतून घरी परतल्यानंतर ते बराच वेळ चिंतेत होते. त्यानंतर त्यांनी घरातच विष प्राशन केले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजू चुड्डके यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील 51 हजार शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर पात्रता, यादी तयार करण्याची प्रक्रिया आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.