दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
abp majha web team July 27, 2026 01:13 PM

Durdarshan oldest Show: दूरदर्शनच्या इतिहासात अनेक लोकप्रिय कार्यक्रम झाले, मात्र एक असा कार्यक्रम आहे जो केवळ दूरदर्शनचाच नव्हे तर देशातील सर्वाधिक काळ सुरू असलेला टीव्ही शो ठरला आहे. 1967 मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम आजही सुरू असून, त्याचे आतापर्यंत 62 सीझन पूर्ण झाले आहेत. भारतीय अंतराळ मोहिमेचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीतून या कार्यक्रमाची संकल्पना साकार झाली होती.

कोणता शो आहे हा?

या कार्यक्रमाचे नाव आहे 'कृषी दर्शन'. हा देशातील सर्वाधिक काळ चालणारा नॉन-फिक्शन टीव्ही शो मानला जातो. 26 जानेवारी 1967 रोजी त्याचे पहिले प्रसारण झाले होते. जवळपास 59 वर्षांनंतरही हा कार्यक्रम सुरू असून, सुरुवातीला दिल्ली परिसरातील सुमारे 80 गावांमध्ये त्याचे प्रसारण केले जात होते. या कार्यक्रमातून शेती, कृषी शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात होती.

'कृषी दर्शन'मागे होती डॉ. विक्रम साराभाई यांची दूरदृष्टी

भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांची कल्पना होती की, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांपर्यंत शिक्षण व माहिती पोहोचवण्यासाठी व्हावा. याच विचारातून 'कृषी दर्शन'ची निर्मिती झाली. या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, सुधारित तंत्रज्ञान आणि कृषीविषयक नवीन माहिती दिली जात होती. आता TRP च्या स्पर्धेत असे माहितीपूर्ण शो वाहिन्यांना पैसा कमावून देणारे नसतात. मात्र, असे अनेक कार्यक्रम आजही अनेक गावांमध्ये पाहिले जातात. आता मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी दूरदर्शनवरील या कार्यक्रमाने देशाचं चित्रच बदललं होतं.

काय असायचं या कार्यक्रमात? 

'कृषी दर्शन'मध्ये कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होऊन शेतीतील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध पीकपद्धतींबाबत मार्गदर्शन करतात. अनेकदा यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी कथा आणि त्यांच्या यशामागील पद्धतीही या कार्यक्रमातून दाखवल्या जातात.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी दूरदर्शन आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाने हा कार्यक्रम प्रायोगिक सार्वजनिक प्रसारण प्रकल्प म्हणून सुरू केला होता. आधुनिक शेती, वैज्ञानिक पद्धती, कृषी अवजारे आणि पिकांच्या व्यवस्थापनाची माहिती देऊन हरित क्रांतीला चालना देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

62 हंगाम आणि 16,780 भागांचा विक्रम

26 जानेवारी 1967 रोजी सुरू झालेल्या 'कृषी दर्शन'ने आजवर 62 हंगाम आणि 16,780 भागांचा टप्पा गाठला आहे. आजही हा कार्यक्रम दूरदर्शनसोबतच डीडी नॅशनल आणि डीडी मल्याळम वाहिनीवरही प्रसारित केला जातो. कृषी क्षेत्रातील माहिती, शिक्षण आणि जनजागृतीसाठी 'कृषी दर्शन' आजही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.