MPSC Paper Leak: देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप झाले होते. मात्र, आता या प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा पार पडली. त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर झाला. 1 ते 21 जुलै या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर 23 जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीत परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा तसेच गुणपत्रिका आणि अंतिम निवडीत विसंगती असल्याचाही दावा करण्यात आला होता.
तक्रार प्राप्त होताच एमपीएससीने तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. आज या सर्वांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या जबाबांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाला काल रात्री मोठे वळण मिळाले. तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ई-मेल पाठवत, पूर्वी केलेली तक्रार बनावट होती, असा दावा केल्याची माहिती एमपीएससीतील सूत्रांनी दिली आहे. या ई-मेलमध्ये पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचला, असे त्यात म्हटले आहे. 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबाने का झाली, याचाही तपास केला जात आहे.
यापूर्वी तक्रारदारांनी एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडे लेखी तक्रार करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप केला होता. तसेच व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करून संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा केल्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून भरती प्रक्रियेवर परिणाम होणार का, याकडे हजारो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, जो कोणी व्यक्ती असेल, तो काही पोलिस अधिकारी आहे का? सीआयडी, ईडीचा अधिकारी आहे का? हा विषय आता लोकांमध्ये आला असून विद्यार्थ्यांमध्येही याबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो आज काय बोलतो, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आमच्याकडे पुरावे आलेले आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे सरकार आणि आयोग काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घ्यायला लावण्यात आले. त्यानंतर सोनम वांगचुक यांनीच आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केला. जर सोनम वांगचुक यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो, तर हा व्यक्ती नेमका कोण आहे?," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
आणखी वाचा