श्रद्धा जपा, पण सुरक्षा विसरू नका! रेल्वेच्या एसी डब्यात लावला चक्क दिवा अन् अगरबत्ती; धक्कादायक व्हिडीओ समोर...
esakal July 27, 2026 11:45 PM

रेल्वेच्या एसी डब्यात एका प्रवाशाने चक्क तेलाचा दिवा आणि अगरबत्ती पेटवून पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नेटिझन्सकडून करण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी एसी कोचमधील वरच्या बर्थवर बसून धार्मिक विधी करताना दिसत आहे. त्याने समोर तेलाचा दिवा आणि अगरबत्ती पेटवली आहे. हे पाहताच डब्यातील दुसऱ्या प्रवाशाने त्याला याबाबत जाब विचारला. बंदिस्त एसी डब्यात उघडी ज्योत पेटवणे धोकादायक ठरू शकते, असे सांगत त्याने दिवा तात्काळ विझवण्याची विनंती केली.

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

व्हिडिओमध्ये चित्रीकरण करणारी व्यक्तीही अगरबत्तीच्या धुरामुळे डब्यातील स्मोक डिटेक्शन यंत्रणा सक्रिय होऊ शकते, तर तेलाच्या दिव्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगताना ऐकू येतो आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही, अशी भूमिका त्या प्रवाशाने घेतली.

ही घटना नेमकी कोणत्या गाडीत आणि कधी घडली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वेसारख्या बंदिस्त जागेत उघडी ज्योत पेटवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

अकोल्यात हातात बांगड्या, ओठांवर लिपस्टिक... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणं पडलं महागात; टवाळखोराला अनोखी शिक्षा

दरम्यान, या व्हिडिओची दखल घेत रेल्वे सेवाने संबंधित पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी ट्रेन क्रमांक आणि पीएनआर क्रमांकाची माहिती मागितली आहे. या घटनेनंतर रेल्वेतील अग्निसुरक्षा नियम आणि प्रवाशांनी पाळायच्या सुरक्षा मार्गदर्शक सूचनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या डब्यांचा काही प्रवासी खासगी जागेसारखा वापर करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका जोडप्याने हनिमूनसाठी रेल्वेचा डबा सजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संबंधित टीसीला निलंबित करण्यात आले होते. आणखी एका रेल्वेत पूजा-अर्चा केल्याचा व्हिडिओही समोर आला होता. आता एसी डब्यात तेलाचा दिवा पेटवल्याची घटना समोर आल्याने रेल्वेतील सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.