पुणे : जेवण देण्याच्या बहाण्याने फूस लावून तळेगाव रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगमधील एका कारशेडमध्ये नेत १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. तापकीरे यांनी हा निकाल दिला.
शरद मुरलीधर साळवे (वय ३५) आणि अंकितसिंग रतनसिंग बिस्ता ऊर्फ कांचन (वय ३४) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी पाहिले. तरुणी २०१६ मध्ये बारामती येथून रेल्वेने प्रवास करत तळेगावला गेली. त्यावेळी दोघांनी तिला जेवण देण्याच्या बहाण्याने फूस लावून रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंगमधील एका कारशेडमध्ये नेले. तेथे तिच्यावर त्यांनी अत्याचार केला. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शमसुद्दीन शेख यांनी अत्यंत बारकाईने तपास करून आरोपींविरोधात भक्कम पुरावे जमा केले. न्यायालयात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तपासादरम्यान जमा करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याच्या तपासात लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, शांताराम फड, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस अंमलदार दत्तात्रेय मोरे, सचिव यादव, सचिन राठोड, स्वाती केंद्रे आणि विजया धिवंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.