बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, कोकण किनारपट्टी, भंडारा, गडचिरोली, अमरावती , चंद्रपूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
विदर्भात गेल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता, परंतु आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात 28 आणि 29 जुलैदरम्यान अतिवृष्टीचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागगपूर हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार
दरम्यान राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे, सर्वत्र जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 28 आणि 29 जुलै या दोन दिवशी अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1 जून ते 27 जुलै या काळात संपूर्ण विदर्भातील 11 जिल्हात एकूण 26 टक्के पावसाची तूट निर्माण झालेली आहे. जुलै महिन्यात निर्माण झालेली पावसाची तूट काही प्रमाणात आता या पावसाने भरून निघण्याची श्यक्यता आहे, मात्र तरी देखील संपूर्ण तूट भरून निघण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे खेडमधील जगबुडी, चिपळूण मधील वाशिष्टी आणि रत्नागिरी मधील काजळी नदी दुथडी भरून वाहत आहे.