कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताच्या ज्ञानेश्वरी यादवने जबरदस्त कामगिरी केली आहे. 53 किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी यादवला पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचं सोनं केलं आणि पदार्पणाच्या स्पर्धेतच रौप्य पदकाला गवसणी घातली. ज्ञानेश्वरीने या स्पर्धेत एकूण 199 किलो वजन उचललं. ज्ञानेश्वरीने स्नॅच फेरीत 88 किलो वजन उचललं आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो वजन उचलून धमक दाखवली. नायजेरियाच्या ओनोमे ओमोलोला डिडिहने एकूण 206 किलो (93 किलो स्नॅच + 113 किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. तर कॅनडाच्या रेबेका ग्रौलक्सने (178 किलो) कांस्य पदक जिंकले. पण ज्ञानेश्वरीसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. यासाठी तिला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला.
ज्ञानेश्वरी यादवचा संघर्षज्ञानेश्वरी यादव छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील भोंडिया गावातील आहे. ती छत्तीसगड पोलिसात असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहे. तिचे वडील स्वत: बॉडीबिल्डर होते. पण कुटुंबासाठी त्यांना खेळ सोडावा लागला. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात आणि त्यांनी आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. एका मुलाखतीत ज्ञानेश्वरीच्या वडील दीपक यादव यांनी सांगितलं की, तिला खेळात प्रावीण्य मिळावं म्हणून दिवसाचे 20 तास काम करत होतो. दरम्यान सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना कोविड काळात तिच्या करिअरला धक्का बसला. कारण हातात काम नसल्याने तिच्यासाठी सप्लिमेंट्स घ्यायला पैसे नव्हते. पण मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले आणि तिचं प्रशिक्षण आणि आहार सुरू ठेवला.
जत्रेत त्या दृष्यांमुळे तिचं आयुष्य बदललंज्ञानेश्वरी सातवी असताना तिने जत्रेत मुलांना वजन उचलताना पाहिलं होतं. तेव्हापासून तिच्या डोक्यात पॉवरलिफ्टिंगचं भूत बसलं होतं. अवघ्या एका वर्षात तिने 37 किलो वजन असताना 65 किलो स्क्वॅट आणि 95किलो डेडलिफ्ट करायला सुरुवात केली. सब-ज्युनियर नॅशनल्समध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर वडिलांनी तिच्या पुढच्या प्रवासासाठी खूप मेहनत घेतली. प्रशिक्षक अजय लोहार विश्वकर्मा यांचं मार्गदर्शन लाभलं आणि तिने आता कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत यश संपादन केलं आहे.