रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनला उशीर झाला तर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना असुविधांना सामोरे जावे लागते. पण भारतीय रेल्वेने प्रीमियम ट्रेनच्या प्रवाशांसाठी काही खास सुविधा पुरवल्या आहेत. IRCTC च्या भोजनासंबंधी निर्देशानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरुंतो सारख्या प्रीमियम रेल्वे जर दोन तास अथवा त्यापेक्षा अधिक विलंबाने धावली तर प्रवाशांना भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी प्रवाशांकडून कोणतेही पैसे आकारले जात नाही. वेळेनुसार, प्रवाशांना नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, चहा आणि स्नॅक्स द्यावे लागते.
प्रवाशांना देण्यात येतात कोणत्या सुविधा?
प्रवासाच्या सुरुवातीला प्रवाशांना बिस्किट देण्यात येतात. त्यासोबतच चहा आणि कॉफी देण्यात येते. प्रवाशांना साखरयुक्त आणि साखरविरहीत पाऊच देण्यात येतात. मिल्क क्रीमर किट देण्यात येते. नाष्टा अथवा संध्याकाळच्यावेळी पांढऱ्या अथवा ब्राऊन बेडचे स्लाईस, चहा, लोणी आणि 200 मिलीलिटर फ्रूट ज्यूस अथवा चहा-कॉफी देण्यात येते. दुपारी आणि रात्री संतुलित आहार देण्यात येतो. त्यामध्ये भात, राजमा, वरण अथवा इतर पदार्थ देण्यात येतात. याशिवाय पुरी, मिक्स भाजी, लोणचं, मीठ आणि मिर्ची पाकिट देण्यात येते. त्यावेळी उपलब्ध जेवण देण्यात येते. एखादा गोड पदार्थ पण असू शकतो.
तीन तासाच्या उशीरानंतर तिकिटाचे पैसे परत
ट्रेन जर तीन तासांपेक्षा अधिक उशीरा धावत असेल अथवा तिच्या मार्गात बदल करण्यात येत असेल तर प्रवाशांचे तिकिट तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येते. प्रवाशाला संपूर्ण तिकिटाचे पैसे परत करण्यात येतात. रेल्वे काऊंटरवरून खरेदी करण्यात आलेले तिकीट जमा करून ते रद्द करण्यात येते. त्याची संपूर्ण रक्कम प्रवाशाला परत करण्यात येते.
जास्त उशीर झाल्यास रेल्वे देते अतिरिक्त सुविधा
ट्रेनला तीन तासापेक्षा अधिक उशीर होत असल्यास भारतीय रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देते. यामध्ये प्रवाशांना प्रतिक्षा कक्ष कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्यात येते. खाद्यपदार्थांचे स्टॉल मध्यरात्रीपर्यंत उघडी ठेवली जातात. यामुळे प्रवाशांना कोणतीही असुविधा होत नाही. तर अशावेळी स्टेशनवर अनुचित प्रकार घडू नये, प्रवाशांसाच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात ठेवण्यात येते.