नवी दिल्ली : नीट पेपरफुटीनंतर (NEET Paper leak) राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे संसदेत विधेयकही मांडण्यात आलं आहे. लोक परीक्षा संसोधन विधेयक 2026 वर आज संसदेत चर्चा सुरू असून सत्ताधारी नेत्यांकडून या विधेयकाचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले जात आहेत. त्याच अनुषंगाने शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनीही संसदेत भावनिक भाषण केलं. मी केवळ खासदार किंवा शिवसेना पक्षाचा नेता म्हणूनच नाही, तर एक डॉक्टर म्हणूनही बोलत आहे. डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी किती संघर्षातून जावं लागतं, हे श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.
मी आज संसदेत बोलण्यासाठी उभा आहे, त्या आईसाठी ज्या माऊलीने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:चे दागिने विकले. मी त्या वडिलांसाठी इथे उभा आहे, ज्यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं, कारण त्यांची मुले नीट किंवा इतर परीक्षांतून डॉक्टर व्हावे, इंजिनिअर व्हावेत, अधिकारी व्हावेत. ज्यातून ते आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढतील, असे भावनिक उद्गार श्रीकांत शिंदेंनी संसदेत काढले. मी केवळ खासदार नाही, मी एक डॉक्टरही आहे. जेव्हा पेपर लीक होतो, तेव्हा एका विद्यार्थ्याचं स्वप्न तुटत नाही, तर संपूर्ण कुटुंबाची हिंमत तुटते. त्यामुळे, आज याच व्यवस्थेवरील कायमचा उपाय, या ऐतिहासिक विधेयकाच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो की, सरकार हा शक्तिशाली कायदा आणत आहे.
मी महाराष्ट्रातून येतो, ज्या महाराष्ट्राने देशाला शिक्षणाचा मार्ग दाखवला, सावित्रीमाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातून मी येतो. शांतीपूर्ण आंदोलनात सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. कुठलाही एक परीक्षा तुमचं आयुष्य निश्चित करत नाही, त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपलं कुटुंब, आपल्या देशाबद्दल विचार करायला हवा, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण सरकार विद्यार्थ्यांसोबत ताकदीनं उभं आहे. पेपरफुटीच्या घटना घडल्यानंतर आमच्या सरकारने विक्रमी वेळेत कठोर कायदे केले, निर्णय घेतले. त्यामुळे, आगामी काळात पेपरफुटीच्या घटना होणार नाहीत.आम्ही फक्त टीका केली नाही यंत्रणेची सफाई केली. सीबीआयने कारवाई करत दिल्ली ते पुण्यापर्यंत 14 आरोपींना तुरुंगात टाकलं, एनटीएने 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं, ही नैतिकता सरकारमध्ये आहे.
नैतिकतेमुळे आमचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत:हून आपला राजीनामा दिला, पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारत सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. आाता, होत असलेल्या या ऐतिहासिक कायद्याच्या माध्यमातून आरोपींना केवळ शिक्षाच नाही, तर मोठा आर्थिक दंडही भरावा लागणार आहे, अशी माहितीही श्रीकांत शिंदेंनी सभागृहात दिली.