रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कोका-कोला कंपनीच्या प्लँटमधून काही कामगारांना कुठल्याही कारणाशिवाय हटवण्यात आल्याने भाजप नेत्याने संताप व्यक्त केला. येथील लोटे एमआयडीसीतील (MIDC) ‘कोका कोला’ कंपनीच्या मुजोरपणाविरोधात भाजप नेते (BJP) वैभव खेडेकर आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे कंपनीच्या गेटवर खेडेकर यांची गाडी रोखून ठेवल्याने खेडेकर चांगलेच संतापले होते. गेटवरील कर्मचाऱ्यासोबत त्यांची वादावादी झाली, तेव्हा मी केवळ मला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालक करतोय, असे तेथील कर्मचारी म्हणत होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसीत असणाऱ्या प्रसिद्ध ‘कोका कोला’ कंपनीचा मुजोरपणा समोर आला आहे. गेली कित्येक महिने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या 8 ते 10 स्थानिक भूमिपुत्रांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कंपनीने अचानक कामावरून काढून टाकले आहे. या प्रकारामुळे भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर आक्रमक झाले असून कंपनीला जाब विचारण्यासाठी ते तिथे गेले होते. त्यांनी थेट कंपनी गाठून एचआर मॅनेजर आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, कंपनीच्या गेटवरच त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यामुळे, ते अधिकच संतापले होते.
कंपनीच्या गेटवर गाडी अडवल्यानंतर ते चांगलेच चिडले होते, ही काय संसद आहे का? मला आतमध्ये का जाऊ दिले जात नाही, असे म्हणत त्यांनी कंपनी प्रशासनाला थेट इशारा दिला. पुन्हा तुमची कंपनी कशात तरी अडकेल, कशात तरी सापडेल मग आमच्याकडे येऊ नका, असे म्हणत खेडेकर यांनी कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यापुढे इशारा दिला. तसेच, येत्या 8 दिवसांत या भूमिपुत्रांना सन्मानाने पुन्हा कामावर रुजू करून न घेतल्यास, कोका कोला कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला आहे.