Ramayana Part 1 Trailer Review: कित्येक दिवसापासून भारतीय सिनेप्रेमी (India Movie) ज्या 4000 कोटींच्या सिनेमाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर सर्वांची प्रतिक्षा संपली असून नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण: पार्ट 1'चा (Ramayana Part 1 Trailer Released) ट्रेलर मेकर्सनी रिलीज केला आहे. 30 जुलै रोजी पहाटे ब्रम्हमुहूर्त गाठून मेकर्सनी ट्रेलर रिलीज (Ramayana Trailer Released) केला आहे. आता ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर या सिनेमाबाबात जोरदार चर्चा रंगली आहे. जाणून घेऊयात, नेमका कसा आहे, 'रामायण: पार्ट 1'चा ट्रेलर?
"देवलोक, पृथ्वीलोक और पाताललोक.. तीनों लोकों में एक ही राज होगा…रावण राज..."
'रामायण' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये साऊथ सुपरस्टार यश 'रावण'च्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते बऱ्याच काळापासून उत्सुक होते. निर्मात्यांनी या उत्सुकतेचा पुरेपूर फायदा घेतला आणि अखेर 30 जुलैच्या पहाटे 'रामायण'चा ट्रेलर प्रदर्शित केलाय.
सुमारे चार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये यश, रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह आणि विवेक ओबेराय यांच्यासह सिनेमातील बहुतांश कलाकारांची झलक पाहायला मिळाली.

रावणाच्या रूपानंच ट्रेलरची सुरुवात, मेकर्सची सर्वात मोठी चाल (South Star Yash As Ravana)
जेव्हापासून 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात रावणाची भूमिका साऊथ सुपरस्टार यश साकारणार हे रिवील करण्यात आलं, तेव्हापासूनच यशचा लूक पाहण्यासाठी सिनेप्रेमी उत्सुक होते. याचाच फायदा मेकर्सनी पूर्णपणे घेतल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येतं. निर्मात्यांनी साऊथ सुपरस्टार यशची रावण म्हणून दमदार ओळख, प्रेक्षकांना ट्रेलरमधून करुन दिली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला रावणाला 'त्रिभुवन-स्वामी' म्हणजेच, (तिन्ही लोकांचा स्वामी) म्हणून दाखवलं गेलंय. या भूमिकेत यश अत्यंत प्रभावी आणि रौद्र रूपात दिसलाय. एका सीनमध्ये तर तो एकट्यानं विशाल सैन्याशी लढा देताना दिसतोय.
त्यानंतर पुढे कथा सुरू होते 'रामायण'ची, रावणाचा अहंकार मोडून काढण्यासाठी आणि पृथ्वीवरील वाढत्या पापाचा भार हलका करण्यासाठी, भगवान विष्णू 'श्री राम' म्हणून अवतार घेण्यास सज्ज झाले आहेत.

श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरचं दैवी रूप (Actor Ranbir Kapoor As Shree Ram)
जब-जब पृथ्वी पर पाप बढ़ा है, भगवान विष्णु ने अवतार लेकर उसकी रक्षा की है। मेरा ज्येष्ठ पुत्र… राम।
रावण रुपातल्या सुपरस्टार यशच्या दमदार एन्ट्रीनंतर आता ट्रेलरमध्ये प्रभू श्रीरामांची एन्ट्री होते. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर खरंच सुंदर दिसतोय. अत्यंत दैवी आणि नजरा खिळवून ठेवणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या रुपावरुन नजरा हटत नाहीत. तशी 'रामायण' सिनेमाचा टीझर रिलीज झाला, त्यावेळी रणबीर कपूरच्या प्रभू श्रीरामांच्या रुपाची झलक पाहायला मिळालेली, पण ट्रेलरमध्ये अधिक प्रभावी आणि तेजस्वीपणे ही भूमिका सर्वांना पाहायला मिळाली.
सहसा घाईघाईत डायलॉग्ज बोलणारा रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना अत्यंत संयमी आणि शांत दिसला. सिनेमात प्रत्येक टप्प्यावर रणबीर कपूर अत्यंत तेजस्वी, डौलदार आणि प्रभावी दिसतोय.

सीता मातेच्या रुपात साई पल्लवी आणि लक्ष्मण साकारलेल्या रवी दुबेची झलक
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत पहिल्यांदाच एकत्र दिसलेत. पण, ट्रेलरमध्ये साई पल्लवीनं उच्चारलेले हिंदी डायलॉग्ज काहीसे खटकतात. निर्मात्यांनी तिचे हिंदी डायलॉग्ज उत्तम 'व्हॉइस-ओव्हर' आर्टिस्टकडून डबिंग करुन घेतलं पाहिजे, असं कुठेतरी सारखं वाटत राहतं. यात रकुल प्रीत 'शूर्पणखा'च्या भूमिकेतही दिसतेय आणि रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारताना तिचे नाक कापताना दिसतोय.
'रामायण' ट्रेलरची वैशिष्ट्य काय? (Highlights Of Ramayan Trailer)
सिनेमाचं पार्श्वसंगीत (Background Music)
केवळ ट्रेलरमधील हांस जिमर (Hans Zimmer) आणि ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांचं संगीतच अंगावर रोमांच उभं करतं. या दोन दिग्गज कलाकारांनी संपूर्ण सिनेमासाठी काय जादू निर्माण केली असेल, याची केवळ कल्पनाच करता येईल.
व्हीएफएक्स (VFX)
भगवान इंद्राच्या ऐरावताचं चित्रण असो किंवा विशालकाय पक्षीराज 'जटायू', व्हीएफएक्सचा वापर करून ज्या प्रकारे या गोष्टी सादर केल्या आहेत, त्या अत्यंत प्रभावी वाटतायत.
सनी देओल (हनुमानच्या भूमिकेत) यांची अनुपस्थिती
'रामायण' सिनेमाच्या ट्रेलरची सर्वात मोठी उणीव काय असेल तर, ती 'हनुमान'च्या भूमिकेत सनी देओल यांची कोणतीही झलक न दिसणं. सनी देओल यांनी नुकतीच सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केलीय. सिनेमाच्या दुसऱ्या भागांत त्यांच्या पात्रांची भूमिका अधिक महत्त्वाची असण्याची अपेक्षा आहे.
रणबीर कपूरचा 'रामायण' कधी रिलीज होणार? (Ranbir Kapoor Ramayana Released Date)
नितेश तिवारी दिग्दर्शित सिनेमा दोन पार्ट्समध्ये प्रदर्शित होणार आहे. 'रामायण: भाग 1' (Ramayana: Part 1) सिनेमा 2026 च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे, तर त्याचा दुसरा भाग 'रामायण: भाग 2' (Ramayana: Part 2) बरोबर एका वर्षानंतर, म्हणजेच 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित करण्याचं नियोजन आहे.
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या सिनेमांपैकी हा एक असून, याचं संगीत ए. आर. रहमान आणि हॅन्स जिमर यांनी दिलं आहे. यातील व्हिज्युअल इफेक्ट्सचं (VFX) काम ऑस्कर-विजेते स्टुडिओ 'DNEG' कडून केलं जातंय, ही कंपनी सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांच्या मालकीची आहे.
या सिनेमात रणबीर कपूर (प्रभू श्री राम), साई पल्लवी (माता सीता), यश (रावण) आणि सनी देओल (हनुमान) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पाहा 'रामायण' सिनेमाचा ट्रेलर : (Ramayana Movie Trailer)