Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान बघायला मिळत असून बहुतांश जिल्ह्याला पावसानं (Maharashtra Rain) अक्षरशः झोडपून काढलं आहे. परिणामी अनेक नदी-नाले आणि धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अशातच 30 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची (Vidarbha Rain Marathi News) शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Updates: 31 जिल्ह्यांना झोडपणार; तीन दिवस कोसळधारेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 31 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळमध्ये भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. तर विदर्भातील गोदिंया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा सर्वदूर पाऊस होताना दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Kolhapur Rain : राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. परिणामी कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फूट 5 इंच इतकी झाली असून जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी घालण्यात नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहे.
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार, पिकांसाठी पोषक पावसाने शेतकरी सुखावला
गेल्या अनेक दिवसांपासून उघडीत दिलेल्या पावसाने काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाळ्याचे जवळपास दोन महिने संपल्यानंतरही जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 240 मिलीमीटर पाऊस बरसला आहे आणि सरासरीच्या हा फक्त 34% आहे जिल्ह्यात साधारणतः पावसाळ्यात सरासरी 840 मिलिमीटर पाऊस भरतो. मात्र यंदाही टक्केवारी कमी असल्याने अद्यापही जिल्ह्यातील सर्वच जलाशय हे कोरडेच आहेत. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेने पिकांची परिस्थिती सुधारणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
मध्यरात्रीच्या पावसानंतर वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला
भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असताना भंडारा जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाला हजेरी लावली. सोबतच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडल्यानं धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात झाला. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून वैनगंगा नदी इशारा पातळीपेक्षा एक मीटर कमी आहे. वैनगंगा नदी प्रचंड वेगानं वाहत असल्यानं नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. आज ऑरेंज अलर्ट असला तरी पहाटेनंतर भंडारा जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे आणि सध्या सूर्यप्रकाश निघालेला आहे.
गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गडचिरोली शहरातील तसेच जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचे पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेली असून चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा रेड अलर्ट पाहता सिरोंचा आणि गडचिरोली तालुका प्रशासनाने सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे