'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 30, 2026 11:13 AM

Sourav Das React To Kangana Ranaut Remarks: विद्यार्थ्यांचं आंदोलन (Students Protest) कदाचित संपलं असेल, तरीही भाजपच्या (BJP) लोकसभा खासदार (Loksabha MP) आणि अभिनेत्री कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) आणि CJP प्रवक्ते (CJP Spokesperson) सौरव दास (Sourav Das) यांच्यातील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. यापूर्वी कंगनानं 'जेन झी' (Gen Z) मधील आंदोलकांना गटारछाप (Generation Gutter) असं म्हटलेलं आणि त्यांचे व्हिडीओ पाहून मळमळल्यासारखं वाटतं, असंही म्हटलेलं. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी कंगना यांना त्यांचा पक्षच सीरिअसली घेत नाही, असं म्हटलेलं. त्यावर कंगनानं पुन्हा एक पोस्ट करुन सौरव दास यांच्यावर निशाणा साधत, हा विद्यार्थी वाटतच नाही, हा बेकार, बेरोजगार... असं म्हणत पलटवार केलेला. अशातच आता हे वाक् युद्ध भलतंच रंगलं असून आता सौरव दास यांनी कंगना रनौतवर जोरदार निशाणा साधला आहे. 

CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, आपण तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखे दिसतो, असं मित्र म्हणतात. तसेच, कंगना रनौत यांची वक्तव्य त्यांच्या तीव्र नैराश्यातून आलेली असावीत आणि त्या मानसिकदृष्ट्या स्थिर अवस्थेतून बोलत नसाव्यात, असं म्हटलंय. 

मनात कोणतंही वैयक्तिक वैर नाही... : सौरव दास (Sourav Das On Kangana Ranaut)

'द मोजो स्टोरी' युट्यूब चॅनलवर बरखा दत्त यांच्याशी बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी अभिनेत्री कंगना रनौत यांच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नाही, असं स्पष्ट केलं. पण कंगना सातत्यानं त्यांच्यावर आणि जेन-झीवर वैयक्तिक टिप्पणी करत आहे, असंही सांगितलं. सौरव दास म्हणाले की, "कंगना यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही वैयक्तिक आकस नाही. त्याच 'जेन-झी' (Gen Z) आणि आता माझ्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी करत आहेत. आज मी माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, "अगं कंगना, जरा शांत हो. आपण एकत्र बसून यावर चर्चा करूया..." अशाच प्रकारे गोष्टींवर चर्चा व्हायला हवी.

CJP प्रवक्ते सौरव दास पुढे बोलताना म्हणाले, देशात संवादाचा अभाव ही एक मोठी समस्या बनलीय. ते म्हणाले, "या देशातील समस्या अशी आहे की, लोक आता एकमेकांशी बोलत नाहीत. चिंतन, चर्चा आणि वादविवाद यांचं प्रमाण कमी झालंय. बोलताना आपण आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत... तिलाही मी नेमकं हेच सांगेन..."

मित्र म्हणाले की, मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो: सौरव दास (Sourav Das vs Kangana Ranaut)

कंगना रनौत करत असलेल्या सततच्या टीकेबाबत बोलताना सौरव दास म्हणाले की, अभिनेत्री-राजकारणी असलेल्या कंगनानं त्यालाच लक्ष्य का केलं? याबद्दल त्यांच्या मित्रांनीही प्रश्न उपस्थित केले होते. यावर पुढे सांगताना ते म्हणाले की, "माझे मित्र मला मेसेज करुन सारखे विचारत होते की, कंगना तुझ्यावर इतकी का चिडचिड करतेय? त्यातल्या एकानं असं म्हटलं की, मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो. माझ्या मित्रांनी मला हेच सांगितलं. हे ऐकून मलाही आश्चर्य वाटलं, कारण तिच्यासारखी व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य माणसावर कशाला टीका करेल?" 

सौरव दास यांनी कंगना रनौत यांना आपल्या शब्दांबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "आपले शब्द जपून वापरा. ​​तुमची वक्तव्य खूपच हताशपणा दर्शवणारी वाटतात, ती एखाद्या मानसिकदृष्ट्या स्थिर व्यक्तीची वक्तव्य वाटत नाहीत. देशातील नव्या पिढीबद्दल बोलण्यापूर्वी विचार करा, कारण शेवटी जनतेची सेवा करण्यासाठीच तुमची निवड झाली आहे. सरकार जनतेच्या विश्वासावर चालते आणि अशा प्रकारे जनतेचा अपमान केला जाऊ शकत नाही."

 

Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.