Family Property Transfer : कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणाबाबत शासनाचा एक चांगला निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
Tv9 Marathi July 29, 2026 11:45 AM

महाराष्ट्र सरकारने कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कुटुंबामध्येच मालमत्तेचे हस्तांतरण विविध कारणांसाठी केले जाते. त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना समान वाटा मिळावा, मालमत्ता नियोजन, कर बचत अशी विविध कारणं त्यामागे असतात. मालमत्तेचे हस्तांतरण म्हणजे केवळ समोरच्याकडे चाव्या सुपूर्द करणे एवढाच नसतो, त्या प्रक्रियेसाठी काही कायदेशीर पार पाडाव्या लागतात. लेखी नोंदी आणि काही नियम पाळावे लागतात. कारण कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मालमत्ता हस्तांतरण केलं तर नंतर वाद निर्माण होऊ शकतात. कायदेशीर कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागू शकतो.

शासनाच्यामहसूल विभागाने नोंदणी अधिनियम, 1908 अंतर्गत महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात तसेच मयत मुलाची पत्नी यांना निवासी किंवा कृषी मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित केल्यास, त्या दस्तऐवजासाठी केवळ ₹२०० नोंदणी शुल्क आकारले जाईल. या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्तेचे हस्तांतरण अधिक सुलभ, किफायतशीर आणि नागरिकाभिमुख होणार आहे. तसेच, या प्रक्रियेसाठी होणारा खर्च वाचणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मालमत्तेचे हस्तांतरण कधी होऊ शकते?

मालमत्तेचे हस्तांतरण व्यक्तीच्या हयातीत किंवा मृत्यूनंतर होते. प्रत्येक प्रकरणात हस्तांतरणासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागते. योग्य पद्धत निवडल्याने आणि योग्य कागदपत्रांचा वापर केल्याने विलंब आणि न्यायालयीन अडचणी टाळण्यास मदत होते.

मालमत्ता हस्तांतरणाचे नियम काय आहेत?

मालमत्ता देणारा जो आहे, त्याने ते स्वेच्छेने दिलेले असले पाहिजे. प्राप्तकर्त्याने ती देणगी स्वीकारली पाहिजे. मालमत्ता ट्रान्सफर करता नोंदणी करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेच्यावेळी किमान दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे.

मालमत्ता हस्तांतरण करताना कुठली कागदपत्रं हवी

मालमत्तेचे हस्तांतरण करताना कायद्यानुसार काही सामान्य मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे आवश्यक असतात. मूळ मालमत्ता हक्कपत्र, दोन्ही पक्षांचा ओळखीचा पुरावा, दानपत्र किंवा मृत्युपत्र, बोजा प्रमाणपत्र, मालमत्ता कराच्या पावत्या, पॅन/आधार तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो, साक्षीदाराचा तपशील

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.