पुणे: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नीने (Pune Crime News) लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 'सिया गोयल' हे नाव देशभरात चर्चेत आले होते. सध्या सिया गोयल न्यायालयीन कोठडीत असली, तर आता या नावाशी साधर्म्य असलेल्या एका भामट्या "सिया"चा दुसराच (Pune Crime News)कारनामा समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून 'सिया' नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांना गंडवले आहे.(Pune Crime News)
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाची सोशल मीडियावरील एका जाहिरातीवर विश्वास ठेवल्यामुळे ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ५६.२५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मुळशी तालुक्यात कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी टप्प्याटप्प्याने ५६ लाखांची गुंतवणूक केली, मात्र त्यांना गुंतवलेला एक रुपयाही परत काढता आला नाही. स्वतःचे नाव "सिया" सांगणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदारांनी हा फसवणुकीचा जाळ विणल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून पौड पोलिसांनी 'सिया' नावाच्या महिलेसह तिच्या अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)
नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या या फसवणुकीची जाणीव तक्रारदाराला तीन महिन्यांनंतर झाली, जेव्हा त्यांनी जमा झालेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराची सुरुवात सोशल मीडियावरील एका जाहिरातीपासून झाली होती. ही जाहिरात एखाद्या नामवंत आणि प्रसिद्ध ब्रोकरेज कंपनीची असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. तक्रारदाराने त्या जाहिरातीवर क्लिक करताच त्यांना व्हॉट्सॲपवरील एका गुंतवणुकीशी संबंधित ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले.
व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडल्यानंतर तक्रारदाराशी "सिया" नावाच्या महिलेने वैयक्तिक संपर्क साधला. तिने तांत्रिक बाबींचे ज्ञान देत तक्रारदाराच्या मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला लावले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्या ॲपमध्ये बनावट नफा दाखवण्यात आला. यासोबतच अत्यंत सवलतीच्या दरात आयपीओ (IPO) शेअर्स मिळतील, असे मोठे आमिषही त्यांना देण्यात आले.
जसजशी तक्रारदाराने अधिक रक्कम गुंतवायला सुरुवात केली, तसतसे त्या ॲपमधील डॅशबोर्डवर त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य प्रचंड वाढताना दिसू लागले. अखेरच्या टप्प्यात तक्रारदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे ॲपवर दाखवण्यात आले.
ॲपमध्ये १० कोटी रुपयांचा नफा दिसू लागल्याने तक्रारदाराने ती रक्कम स्वतःच्या खात्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ते पैसे जमा होऊ देण्याऐवजी, ही रक्कम मिळवण्यासाठी आणखी ३० लाख रुपये 'सिक्युरिटी डिपॉझिट' म्हणून भरावे लागतील अशी अट घातली.
पैसे परत न मिळता उलट आणखी रक्कमेची मागणी होत असल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने अतिरिक्त पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांच्याशी असलेला सर्व संपर्क तोडला आणि गुंतवलेली ५६.२५ लाखांची मूळ रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार पोलीस पाटलाने तत्काळ पौड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे पोलीस पाटील आहेत, आंधळे (मुळशी) येथील, यांना नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी एक इन्स्टाग्रामवर रील पाहिली. त्या रीलमध्ये गुंतवणुकीसंदर्भातील रील होती ती. आणि त्याच्यामध्ये 'व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड' (Ventura Securities Limited) ही शेअर मार्केट गुंतवणूक करणारी जाहिरात होती. ज्याच्यामध्ये परतावा तुम्हाला अधिक मिळेल, अशा स्वरूपाची जाहिरात होती आणि ती रील पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांचा मोबाईल जॉईन केला. आणि त्यांना नंतर नेटवर्कद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे (WhatsApp) त्यांना लिंक देण्यात आली. 'व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड' या क्लबमध्ये त्यांना जॉईन करण्यात आलं आणि त्या क्लबमध्ये जॉईन केल्यानंतर यांच्या नावाने, त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावाचं एक डुप्लिकेट अकाउंट तयार करण्यात आलं आणि त्यामध्ये यांनी डिसेंबर २०२५ पासून ते जानेवारी पर्यंत... म्हणजे एक पूर्ण महिना, १३ वेळा ट्रान्सॅक्शन (Transaction) केलेलं आहे. एकूण ५६ लाख २५ हजार रुपये त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी भरलेले आहेत.
ज्यावेळी त्यांनी त्यांना विड्रॉल (Withdrawal) मागितलं, तर त्यावेळेला त्यांच्याकडून समोरून काही प्रतिसाद येणं बंद झालं. आणि त्यावेळेला यांच्या लक्षात आलं की, आपली या ठिकाणी आर्थिक फसवणूक झालेली आहे आणि नंतर त्यांनी १९३० (1930) ला याबाबत माहिती दिली आणि पोलीस स्टेशनला त्याबाबतची एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलेली आहे. एकूण ५६ लाख २५ हजार रुपयांची त्यांची फसवणूक झालेली आहे. पौड पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात येतंय की, या ज्या काही रील्स असतील किंवा जाहिराती असतील, या आर्थिक गुंतवणूक करत असताना आपण खात्री करावी. या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडून पैसे काढून घेतले जातात, आपल्याला अधिक परताव्याचं आमिष दाखवलं जातं. अशा आमिषाला कोणीही कृपया बळी पडू नका. आपली या ठिकाणी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.