मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी येथील गोरक्षनाथ टेकडीवर योगी रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बुधवारी (ता. २९) भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, हरियाना, राजस्थान, वापी व सिलवासा येथील नाथपंथीय साधू आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर गोरक्षनाथ टेकडी परिसरात "खडेश्वरी महाराज की जय"च्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.
उत्सवाची सुरुवात सकाळी सात वाजता होमहवनाने झाली. त्यानंतर सकाळी अकरा वाजता योगी रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांच्या समाधीचे तसेच बाबा खेतानाथजी यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. चरणपादुकांचा अभिषेक बाबा खेतानाथजी ट्रस्टचे अध्यक्ष महंत कृष्णनाथ योगी महाराज, मिर्चीनाथ महाराज, तुफाननाथ महाराज आणि माई महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी समाधीस्थळावर दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
समाधी परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिसरात अखंड नामस्मरण, जयघोष आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळत होते. तांबडेमळा, अवसरी खुर्द, शेवाळवाडी, मंचर तसेच परिसरातील गावांमधील मोठ्या संख्येने भाविकांनी उत्सवात सहभाग घेतला.
पालखी सोहळ्याला विशेष आकर्षण लाभले. पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी पराग मिल्क फूड्सचे संचालक पूजन शहा, उद्योजक अरविंद वळसे पाटील, ॲड अमृता गुरव,सरपंच माधुरी विजय शेटे,ऋषिकेश गावडे, बाबुराव तांबडे,संतोष धनश्री,समीर बोऱ्हाडे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. डुडुळगाव (आळंदी) येथील ढोल-लेझीम पथकाने तालबद्ध सादरीकरण करून मिरवणुकीत उत्साह निर्माण केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात पालखी टेकडी परिसरातून प्रदक्षिणा घालत पुढे सरकली.
महिला भाविकांनी फुगड्या, भजन आणि पारंपरिक भक्तिगीतांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचा आनंद व्यक्त केला. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी एकमेकांना गुरूंचे आशीर्वाद देत उत्सव अधिक रंगतदार केला.
कार्यक्रमाला किशोर अडवाणी, सुरेश भोर, सुभाष सोनी, भरत सोनी, दत्ता थोरात, मिलिंद खुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण उत्सवाचे नियोजन आणि व्यवस्था शिवराज भोर, बापूसाहेब निघोट, अनुपम भोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुयोग्यरीत्या सांभाळली. त्यामुळे हजारो भाविकांच्या उपस्थितीतही कार्यक्रम सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.