सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार
esakal July 30, 2026 02:45 AM

सोलापूर : सोलापूर शहरातील मंगळवार पेठेतील प्रसिद्ध सराफ व्यापाऱ्याला चौघांनी ८४ लाख ५२ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. याशिवाय १२३० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दागिनेही परस्पर विकले. चौघांनी २०१४ ते २०२३ या काळात सुमारे अडीच काेटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद गणेश गुरूराव पावसकर (रा. सराफ, रा. पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली आहे.

फिर्यादी गणेश पावसकर हे सराफ व्यावसायिक आहेत. २०१४ ते २०२३ या प्रदीर्घ कालावधीत संशयित आरोपींनी आपापसात संगनमत करून पाहुणे असलेल्या व ओळखीच्या सराफ व्यापाऱ्याचा विश्वासघात केला. यात राम व्यंकटेश शेठ, लक्ष्मण शेठ (दोघेही रा. गद्धेमणी, जि. उत्तर कन्नड, सध्या रा. अफझलपूर, कर्नाटक), प्रकाश शिवाजी पवार (रा. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर) आणि विवेक श्रीकांत भंडारकवठेकर (रा. हत्तुरेवस्ती, ओम नमशिवाय नगर, सोलापूर) यांचा समावेश आहे.

फसवणुकीचा प्रकार समोर आल्यावर सराफ व्यापाऱ्याने त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी लंपास केलेले दागिने, रोकड परत करतो म्हणून त्यांनी सांगितले. पण, त्यांनी ना पैसे ना दागिने परत केले, उलट त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सराफ व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

फसवणुकीची पद्धत अशी...

  • सोन्याची हेराफेरी : दुकानातील नफ्यातील आणि भांडवलातील ४३० ग्रॅम सोने तसेच गुंतवणुकीच्या भिश्या लावून सुमारे ८०० ग्रॅम सोन्याचा अपहार केला.

  • रोख रक्कम लाटली : दुकानातील रोख रकमेतून तसेच लोकमंगल को-ऑप बँकेच्या खात्यातून लाखो रुपयांची रोकड मालकाच्या परस्पर स्वतःसाठी काढून घेतली.

  • ऑनलाइन पैसे ट्रान्सफर : ग्राहकांना संशयित आरोपी विवेक भंडारकवठेकर व प्रकाश पवार यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगून २२ लाख रुपये परस्पर लांबवले.

  • गहाण ठेवलेल्या दागिन्यात अपहार : दुकानात सोने गहाण ठेवणाऱ्या ग्राहकांना पावती न देता, स्वतःच्या नावाने पावत्या बनवून ते दागिने परस्पर इतरांना जास्त व्याजाने गहाण दिले.

  • मनीलँडिंग आणि इन्शुरन्स : दुकानाच्या नफ्यातून मिळणारी वार्षिक रक्कमेचा हिशोब न देता तो नफा स्वतः घेतला. तसेच एलआयसी इन्शुरन्स आणि कामगारांच्या खात्याचा गैरवापर केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.