नागपूर : एकेकाळी घरघर लागलेल्या अभियांत्रिकी शाखेत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बुम आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातूनच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १३ हजार ६६९ जागांची वाढ झाली आहे. यंदा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत २ लाख १६ हजार ५५२ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या २ लाख २ हजार ८८३ जागांचा समावेश होता.
राज्यातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १११ अभ्यासक्रमांसाठी यंदा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता पहिल्या फेरीतील पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
२ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीची प्रवेशयादी जाहीर होणार असून, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यंदाही विद्यार्थ्यांचा कल संगणक शाखांकडे कायम असल्याचे जागांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी सर्वाधिक ३०,९९३ जागा उपलब्ध आहेत. त्यापाठोपाठ यांत्रिकी शाखेत २४ हजार ४८१, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन २१ हजार ८२१, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेत २० हजार ४२३ आणि सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत १७ हजार ५०० या शाखांचा क्रमांक लागतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगसारख्या उदयोन्मुख अभ्यासक्रमांमध्येही जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्यातील एकूण २ लाख १६ हजार ५५२ जागांपैकी १ लाख ९२ हजार ३० जागा सर्वसाधारण प्रवेशासाठी तर १५ हजार ७३४ जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि ८ हजार ७८८ जागा टीएफडब्ल्यूएस योजनेसाठी राखीव आहेत.
अभियांत्रिकी प्रवेश २०२६-२७
एकूण महाविद्यालये : ३८०
अभ्यासक्रम : १११
एकूण जागा : २,१६,५५२
गेल्या वर्षीच्या जागा : २,०२,८८३
यंदाची वाढ : १३,६६९ जागा
नोंदणीकृत विद्यार्थी : २,४४,३५५
पहिली प्रवेशयादी : २ ऑगस्ट
प्रवेश निश्चिती : ३ ते ५ ऑगस्ट
सर्वाधिक जागा असलेल्या शाखा
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग – ३०,९९३
मेकॅनिकल इंजिनिअरिंग – २४,४८१
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन – २१,८२१
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग – २०,४२३
सिव्हिल इंजिनिअरिंग – १७,५००