Pargaon POCSO Case: पारगावमध्ये अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग; दोन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा, अटक
esakal July 30, 2026 02:45 AM

खुटबाव : पारगाव ( ता. दौंड) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन सख्ख्या बहीणींचा विनयभंग केल्याप्रकरणी खुटबाव येथील दोन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आरोपी प्रविण गणपत थोरात व दिनेश दत्तात्रय पासलकर (दोन्ही रा. खुटबाव ता. दौंड. जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

या युवकांनी २० जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजता व २७ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजता या युवतींचा विनयभंग केला आहे. वरील नमूद केलेल्या वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व फिर्यादी यांची बहिण या शाळेतून घरी येत असताना आरोपींनी त्यांच्या ताब्यातील (इको गाडी नंबर एम. एच. ४२ बी एस ८५३५) यामध्ये येवून फिर्यादी व फिर्यादीची बहिण यांचा पाठलाग केला. त्यांना गाडी आडवी लावून आरोपी क्र. १ याने गाडीतून खाली उतरून मला ‘तू मला खूप आवडतेस’ असे म्हणून फिर्यादीचा डावा हात हात धरून त्याचे जवळ ओढून घेऊन फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

तसेच आरोपी क्र. २ याने फिर्यादीची बहिणीस हाताला धरून त्याचे अंगावर ओढून घेतले. संबंधित घटना पारगाव येथील ग्रामस्थ मनोज बोत्रे व अतुल मेमाणे यांना समजली. त्यांनी आरोपी युवकांच्या गाडीचा २५ किलोमीटर पाठलाग केला. परंतु आरोपी त्यांना सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी फिर्यादी मुलीचे वडील शाळेमध्ये आले व त्यांनी संबंधित प्रकार प्रशासनाला सांगितला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव बोत्रे यांनी संबंधित बाब यवत पोलिसांना कळवली. त्यानंतर मंगळवार दिनांक २८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.