Anna Bhau Sathe Memorial : अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दादाभाऊ लोखंडे यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम; विविध संघटनांचा पाठिंबा
esakal July 30, 2026 02:45 AM

शिरूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठीच्या नियोजीत जागेची आज महसूल यंत्रणेने पाहणी करून पंचनामा केला. मात्र, केवळ पाहणी करून चालणार नाही, तर स्मारक उभारण्याबाबत ठोस कार्यवाही करावी, असा आग्रह धरत, लहूजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा कोअर कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे यांनी आपले उपोषण आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही चालूच ठेवले. आज या आंदोलनात महिला भगिनींनी सहभाग घेत लाक्षणिक उपोषण केले तर विविध संस्था - संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

शिरूर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे उचित स्मारक व लाटेआळी तसेच इंदिरानगर येथे अण्णाभाऊंच्या नावाने स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी दादाभाऊ लोखंडे व विनोद उर्फ पप्पू साठे हे सोमवार (ता. २७) पासून नगर परिषदेच्या मंगल कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह काल लोखंडे यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. दरम्यान, मी यापूर्वीही या मागणीसाठी आठ दिवसांचे उपोषण केले असून, नगर परिषदेने प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा करण्यात चालढकल केल्याचा आरोप लोखंडे यांनी केला. आता स्मारक उभारण्याबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय कुठल्याही स्थितीत उपोषण आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण उमप, तालुकाध्यक्ष विशाल जोगदंड, मातंग एकता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा रोहिणी शेंडगे, शिरूर तालुकाध्यक्ष सतीश बागवे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश थोरात, मनसे चे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, तालुका संघटक संदीप कडेकर, आप चे शहर अध्यक्ष अनिल डांगे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष चेतन साठे, भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, युवासेनेचे शहर प्रमुख अमोल लुणिया, माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे यांच्यासह उमेश शेळके, अमोल चव्हाण, नीलेश पवार, संतोष थेऊरकर, स्वाती साठे, ॲड. आयेशा सय्यद या नगरसेवकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक म्हणजे केवळ पुतळा उभारणार नसून, सर्व महापुरूषांची चरित्रे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, समाज बांधवांचे विविध उपक्रम व कार्यक्रम करण्यासाठी सभागृह असे या स्मारकाचे स्वरूप असावे. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकासाठी पाठपुरावा चालू असून, प्रशासन पातळीवर केवळ आश्वासनांनी बोळवण केली जाते व कागदी घोडे नाचविले जातात.

दादाभाऊ लोखंडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा कोअर कमिटी, लहूजी शक्ती सेना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.