Nashik's Dilip Mahadu Gavit wins gold in Commonwealth Games : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली, तर बॉक्सिंगपटूंनी सहा पदकं निश्चित केली. नाशिकच्या दिलिप गावित याने पुरुषांच्या १०० मीटर पॅरा T47 शर्यतीत १०.७१ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करत त्याने राष्ट्रकुल खेळांमधील एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच शर्यतीत भारताच्याच मोहम्मद बासिलने रौप्यपदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकणारा दिलीप हा पहिले भारतीय पुरुष पॅरा ॲथलीट ठरला आहे. या शिवाय श्रीशंकर मुरलीने पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदक पटकावले.
दिलीप महादू गवितने गुरुपौर्णिमेला हे सुवर्णपदक जिंकले आणि ते प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना समर्पित केले. शेतात काम करत असताना काळे यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याच्या क्रीडा कारकिर्दीला आकार दिला, याचे श्रेयही त्याने दिले. आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना गवित म्हणाला, “सुरुवात थोडी संथ होती. नंतर मी वेग वाढवला. पुढच्या वेळी मी आणखी चांगली कामगिरी करेन. मला फक्त १०० मीटर धावायचे होते. सहसा मी ४०० मीटर धावतो; ती माझी मुख्य स्पर्धा आहे. पण इथे मी १०० मीटर धावलो आणि मला या शर्यतीचा खूप आनंद झाला.”
बॉक्सिंगपटूंनी आपापल्या गटाच्या उपांत्य फेरीत धडक देताना भारतासाठी सहा पदकं निश्चित केली आहेत. महिलांच्या ५१ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत साक्षी चौधरीने केटलिन फ्रायर्सचा (उत्तर आयर्लंड) पराभव केला आणि उपांत्य फेरीत धडक मारली . महिलांच्या ५७ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत जैस्मिन लंबोरियाने एलिस ग्लिनचा (इंग्लंड) पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. अरुंधती चौधरीने ७० किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत मॉर्गन हेंडरसनचा (न्यूझीलंड) पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली.
सचिन सिवाचने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत ट्रेझर मोरेमीचा (बोत्सवाना) पराभव केला. अंकुश पांघलने ८० किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत जेड मायकॉकचा (सेशेल्स) पराभव केला. तेच नरेंद्र बेरवालने ९०+ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत मायकल सेकोचा (सामोआ) पराभव केला. या तिघांनीही उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक पक्के केले. राष्ट्रकुल स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभूत बॉक्सरही कांस्यपदक जिंकून जातो.