Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'आमच्या लाडक्या नाईक बाई' (Aamchya Ladkya Naik Bai) ही मराठी मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) शारदा ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर तितक्याच वास्तववादी पद्धतीनं उभी राहावी, यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Marathi Actress Aishwarya Narkar) यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा सायकल शिकण्याचं आव्हान स्वीकारलं. मालिकेची कथा अलिबागमधील एका छोट्याशा गावात घडते. आजही अनेक गावांमध्ये सायकल ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
शारदासाठीही ती फक्त दोन चाकांची सायकल नाही, तर तिच्या स्वावलंबनाचं, जिद्दीचं आणि रोजच्या आयुष्याशी सुरू असलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे. त्यामुळे पडद्यावर प्रत्येक क्षण खरा वाटावा यासाठी ऐश्वर्या यांनी मनापासून सराव केला.
याविषयी बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, "सायकल चालवताना जसा तोल सांभाळावा लागतो त्याचप्रमाणे संसार, नोकरी, नाती आणि स्वतःची स्वप्नं यांचाही तोल प्रत्येक स्त्री रोज सांभाळत असते. शारदाचा हा प्रवास प्रत्येक महिलेला स्वतःचा वाटेल. लहानपणी आम्ही 20 पैशांना भाड्याने सायकल घेऊन चालवायचो. मी काही फार सराईत नव्हते, पण शिकायची जिद्द होती. सायकल वेगात गेली की, धीर यायचा, पण थांबवताना मात्र नेहमीच धडपड व्हायची. इतक्या वर्षांनंतर पुन्हा सायकल हातात घेतली तेव्हा तीच भीती आणि तोच उत्साह पुन्हा अनुभवला. सुरुवातीला हे मोठं आव्हान वाटलं पण आमच्या संपूर्ण टीमने दिलेल्या विश्वासामुळे ते सहज पार पाडता आलं. त्या सरावात माझं बालपण पुन्हा एकदा जगल्यासारखं वाटलं..."
भूमिकेसाठी घेतलेली ही मेहनत ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयातील समर्पण अधोरेखित करते. शारदाच्या संघर्षात, तिच्या धैर्यात आणि तिच्या स्वप्नांच्या प्रवासात अनेक महिलांना स्वतःचं प्रतिबिंब दिसेल आणि म्हणूनच 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही मालिका प्रत्येक घराशी भावनिक नातं जोडेल.