घर असो वा ऑफिसचे शिफ्टींग इलेक्ट्रॉनिक आयटम्स पॅक करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. कारण इलेक्ट्रॉनिक आयटम्स नाजूक व महागडे असतात. शिवाय काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स जर डॅमेज झाले तर त्या दुरुस्त होतीलच याची गॅरंटी नसते. यामुळे या वस्तूंची ने आण करेनेही जोखमीचे असते. पण पॅकेजिंगच्या काही स्मार्ट ट्रिक्स योग्य पद्धतीने फॉलो केल्या तर नुकसान होत नाही.
त्यासाठी तुम्ही राहत असलेले घर किंवा ऑफिस भाड्याचे आहे की मालकीचे ते आधी बघावे. कारण जर घर किंवा ऑफिस तुमच्याच मालकीचे असेल आणि तुम्ही कायमचे किंवा अनेक वर्ष तिथेच राहणार असाल तर शिफ्टींगचा प्रश्न उद्भवणार नाही.
पण जर तुम्ही भाड्याच्या वास्तूत राहत असाल तर मात्र ठराविक कालावधीनंतर तुम्हाला ती वास्तू सोडावीच लागणार. हे लक्षात ठेवून इलेक्ट्रॉनिक आयटम्सचे ऑरिजनल बॉक्सेस आणि पॅकींग मटेरियल सांभाळून ठेवावे. ते रिपॅकिंगसाठी उपयोगी असतात.
पॅकिंगसाठी बबल रॅप, कुशनिंग मेटेरियल,पॅकिंग पेपरचा वापर करावा. तसेच बरेचजण इलेक्ट्रॉनिक आयटम्स पॅक करण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करतात. पण तसे करू नये. वर्तमान पत्रात इलेक्ट्रॉनिक आयटम्स सुरक्षित नसतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची पॅकिंग करताना त्याच्या तारा, वायरी प्लगबोर्ड मधून काढण्याआधी त्याचे फोटो काढा. त्यामुळे नव्या ठिकाणी तार जोडणे सोपे होईल. तारा, वायरी पॅक करताना त्यावर स्टीकर लावावे. स्टीकर वर कोणती तार कोणत्या डिवाईसची आहे ते लिहावे. बॉक्सवर त्या त्या वस्तूचे नाव लिहावे.





