तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
मिकी घई, एबीपी माझा, पुणे July 30, 2026 07:43 PM

पुणे: पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या वादग्रस्त कारवायांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी साताऱ्यात गेलेल्या पुणे पोलीस (Pune Police) दलातील एका महिला अधिकाऱ्यासह तीन कर्मचाऱ्यांनी तपासाचे सोपस्कार उरकून थेट कास पठार आणि परिसरातील पर्यटनस्थळांची सफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघांची २ वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची दंडात्मक कारवाई केली आहे.(Pune Police)

Pune Police:  नेमका काय आहे प्रकार?

ही घटना ४ एप्रिल रोजी घडली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार आणि महिला पोलीस शिपाई हे तिघे महिला फिर्यादीला सोबत घेऊन साताऱ्यात गेले होते. मात्र, प्रत्यक्षात गुन्ह्याचा गांभीर्याने तपास न करता पोलीस पथकाने पर्यटनाला प्राधान्य दिल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले.

Pune Police:  तपास बाजूला, ढाब्यावर जेवणावर भर!

४ एप्रिल रोजी साताऱ्यात पोहोचल्यानंतर नियम नियमानुसार स्थानिक साताऱ्या पोलिसांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी थेट प्रसिद्ध कसे ढाबा गाठून जेवणावर ताव मारला. त्यानंतर दुपारी ३:१५ च्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून केवळ नावालाच घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथील नागरिक किंवा प्रत्यक्षदर्शींकडे कोणतीही चौकशी न करताच हे पथक निघून गेले.

Pune Police: फिर्यादीच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत कास पठाराची सफर

पंचनामा उरकल्यानंतर पुण्याकडे परतणे आवश्यक असताना या पथकाने थेट साताऱ्याचे प्रसिद्ध 'कास पठार' आणि इतर प्रेक्षणीय स्थळांचा रस्ता धरला. सोबत आलेल्या महिला फिर्यादीने 'माझी आई घरी आजारी असून लवकरात लवकर पुण्यात चला' अशी गयावया केली. परंतु, पोलिसांनी तिच्या विनंतीला केराची टोपली दाखवत पर्यटन सुरूच ठेवले. तपासाच्या बहाण्याने सहलीचा आनंद लुटल्याचा ठपका आता चौकशी अंती त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Pune Police: महिला फिर्यादीच्या सुरक्षेशी खेळ

पर्यटन आटोपून हे पथक रात्री १ वाजता पुण्यात परतले. एवढ्या उशिरा एका महिला फिर्यादीला सुरक्षितपणे घरी पोहोचवणे पोलिसांचे कर्तव्य होते. मात्र, पोलिसांनी प्रथम तिला स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न केला. तिने विनंती केल्यावर अखेर तिला शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडून दिले. या वर्तनातून पोलिसांनी महिला सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाले आहे.

Pune Police:  कर्तव्यात कसूर; दलाची प्रतिमा मलिन

या सर्व प्रकाराची चौकशी केल्यानंतर सादर झालेल्या अहवालात, संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणा, बेशिस्त आणि हलगर्जीपणा दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करत प्रशासनाने तिघांचीही पुढील दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ (Increment) रोखण्याची कडक शिक्षा सुनावली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.